X Close
X
9819022904

देशातील औद्योगिक उत्पादन थंडावले


Mumbai:

नवी दिल्ली : केंद्र सरकार अर्थव्यवस्था सुधारत असल्याचा दावा करत असले तरी प्रत्यक्षात चित्र वेगळे असल्याची आकडेवारी समोर आली आहे. देशाचे औद्योगिक उत्पादन हे डिसेंबरमध्ये ०.३ टक्क्यांनी घसरले आहे. उत्पादन क्षेत्राच्या नकारात्मक कामगिरीने औद्योगिक उत्पादन घटल्याचे सरकारी आकडेवारीत दिसून आले.

मागील वर्षाच्या ऑगस्ट (-१.४ टक्के), सप्टेंबर (-४.६ टक्के) आणि ऑक्टोबरमध्ये (-४.६ टक्के) औद्योगक उत्पादनात घसरण झाली होती. या तीन महिन्यांच्या सलग घसरणीनंतर नोव्हेंबरमध्ये १.८ टक्क्य़ांची औद्योगिक उत्पादन क्षेत्राने नोंद केली होती.

राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाच्या आकडेवारीनुसार डिसेंबर २०१८ मध्ये औद्योगिक उत्पादनाचा वृद्धीदर हा २.९ टक्के होता. डिसेंबर २०१९मध्ये वीजनिर्मितीचे प्रमाण घसरले आहे. तर २०१८च्या डिसेंबरच्या तुलनेत डिसेंबर २०१९मध्ये खाण उद्योगाने वृद्धीची नोंद केली आहे. चालू आर्थिक वर्षात एप्रिल-डिसेंबरदरम्यान औद्योगिक उत्पादनाचा दर हा केवळ ०.५ टक्के राहिला आहे, तर वर्ष २०१८-१९ मध्ये औद्योगिक उत्पादनाचा दर हा ४. ७ टक्के होता.

आयआयपीच्या आकडेवारीबाबत डेलाईट इंडियाच्या अर्थतज्ज्ञ रुम्की मजुमदार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या, डिसेंबरमध्ये औद्योगिक उत्पादन घसरल्याने औद्योगिक चलन-वलनातील सुधारणेबाबत चिंता वाढली आहे. हे संपूर्ण अर्थव्यवस्थेसाठी चांगले नाही. यापूर्वीच सर्व उद्योग हे जागतिक आव्हानांना सामोरे जात आहेत.

जानेवारीत महागाईची ७.५९ टक्क्य़ांची नोंद
किरकोळ बाजारातील महागाईचे प्रमाण वरचेवर वाढत आहे. जानेवारी २०२० मध्ये किरकोळ बाजारातील महागाई ७.५९ टक्के झाली आहे. हे प्रमाण भारतीय रिझव्‍‌र्ह बँकेच्या मर्यादेहून अधिक आहे. अन्नाच्या किमती वाढल्याने महागाई वाढल्याचे सरकारी आकडेवारीतून दिसून आले आहे.

ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित किरकोळ बाजारातील महागाई ही डिसेंबर २०१९ मध्ये ७.३५ टक्के होती, तर गतवर्षी किरकोळ बाजारातील महागाईचे प्रमाण १.९७ टक्के होते. जानेवारीत अन्नाच्या महागाईचे प्रमाण १३.६३ टक्के होते. तर गतवर्षी जानेवारीत अन्नाच्या महागाईचे प्रमाण हे (-) २.२४ टक्के होते. तर गतवर्षी डिसेंबरमध्ये अन्नाच्या महागाईचे प्रमाण हे १४.१९ टक्के होते.

भाजीपाल्यांतील महागाईचे प्रमाण ५०.१९ टक्के, डाळीमधील महागाईचे प्रमाण १६.७१ टक्के, मांस आणि माशांमधील महागाई १०.५० टक्के, तर अंडय़ाच्या महागाईचे प्रमाण १०.४१ टक्के राहिले आहे. भारतीय रिझव्‍‌र्ह बँकेने महागाईचा दर कमीत कमी २ टक्के, तर जास्तीत जास्त ४ टक्के असा मर्यादित ठेवण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. फेब्रुवारीमध्ये भारतीय रिझव्‍‌र्ह बँकेने पतधोरण जाहीर करताना महागाईत आणखी वाढ होणार असल्याची शक्यता व्यक्त केली होती.