X Close
X
9819022904

तुम्हाला माहीत आहे का? : पखवाज


Mumbai:

एक भारतीय तालवाद्य. पखवाजास मृदंग असेही सामान्यपणे म्हटले जाते; तथापि आजच्या ‘मृदंग’ या कर्नाटक संगीतातील तालवाद्यात व उत्तर भारतीय पखवाजाच्या रचनेत आणि वादनपद्धतीत काहीसा फरक आहे. अबुल फज्लने आईन-इ-अकबरीत (१५९८) लिहिल्याप्रमाणे ‘पखवाज’ हे नाव ‘आवाज’ या तत्कालीन रूढ असलेल्या वाद्यावरून पडले आहे.

प्राचीन संस्कृत ग्रंथांमध्ये मृदंग अथवा मुरज, पणव व दर्दूर या तालवाद्यांना ‘पुष्कर’ जातीतील वाद्ये असे संबोधले आहे. वाजसनेय संहितेत ‘अदम्बर’, वाल्मिकीच्या रामायणात ‘मड्डक’, तसेच शार्ङगदेवकृत संगीत रत्नाकरात ‘पटह’ या तत्सम तालवाद्यांचा उल्लेख आढळतो. ‘मृत् अङगं यस्य स:’ म्हणचे मातीचे अंग असलेले (वाद्य).

प्राचीन काळी या पोकळ तालवाद्याचे अंग नदीकाठची मऊ चिकणमाती, गव्हाचे अथवा जवाचे पीठ यापासून बनवण्यात येत असे. कालांतराने ते बीज, खैर, रक्तचंदन, आबनूस इत्यादी वृक्षांच्या लाकडापासून बनविण्यात येऊ लागले. पखवाजाचा आकार पिंपवजा असून तो आपल्यापुढे ठेवल्यानंतर डाव्या बाजूच्या तोंडाचा घेर उजव्या बाजूच्या तोंडापेक्षा काहीसा मोठा असतो. डाव्या तोंडाचा व्यास सुमारे २५ सेंमी, तर उजव्या तोंडाचा व्यास १६ सेंमी असतो. डाव्या बाजूकडून सुमारे १२ सेंमी अंतरावरील खोडाचा आकार किंचित फुगीर असतो. त्याची लांबी सु. ६० सेंमी व फुगा-याचा घेर सुमारे ९० सेंमी असतो. दोन्ही तोंडे बक-याच्या समतल चामडय़ांनी मढविली जातात. त्यांना चाटीकडून (किनारीकडून) पाडलेल्या प्रत्येकी चोवीस छिद्रांमधून गज-याच्या वीणेच्या मदतीने चामडी वाद्य ओवून ही दोन्ही आवरणे (पुडय़ा) ताणून बसविली जातात. ‘चाटी’च्या चामडय़ाची घनता दाट असते. चामडी वाद्यांमधून आठ लाकडी गठ्ठे ओवलेले असतात. हे वरखाली करून, तसेच गज-यावर हातोडीने अथवा दगडाने प्रहार करून पखवाज आवश्यक स्वरात मिळविला जातो.

उजव्या पुडीवर अर्धा छटाक लोखंडाचा वस्त्रगाळ कीस, मैद्यापासून अगर भातापासून बनविलेली एक तोळा चिकट लाही आणि तीन मासे काळी शाई किंवा कोळशाची भुकटी एवढय़ा घटकांपासून बनविलेल्या शाईचा वर्तुळाकार थर दिलेला असतो. यामुळे पखवाज स्वरात मिळविणे शक्य होऊन तारध्वनी निर्माण होण्यास मदत होते.

डाव्या तोंडावर गव्हाच्या पिठाची कणिक मळून तिचा थर वादनापूर्वी दिला जातो. तो कमी-अधिक करून आघातानंतर निर्माण होणारा खर्जध्वनी आवश्यक कर्णमधूर ठेवण्यास मदत होते. पखवाज आडवा धरतात आणि हाताने वाजवितात. वाद्यावर दोन्ही हातांच्या गुळवलेल्या बोटांनी व पंजांनी आघात केले जातात. काही वेळा उजव्या तोंडावर सुटय़ा बोटांच्या आघातांनीही बोल निर्माण केले जातात. वाद्याचा आवाज अतिशय कर्णमधुर व गंभीर असतो. वादनात विविध बोलसमूहांनी युक्त व विविध लयबंधांनी गुंफलेल्या गती, गतपरणी, परणी, रेले वगैरे रचनाप्रकार वाजवता येतात. मुळात हे नृत्यासाठी, तसेच धृपद-धमारसारख्या संगीतरचनांच्या साथसंगतीसाठी उपयोगात येणारे वाद्य आहे.

(संदर्भ : मराठी विश्वकोश)