X Close
X
9819022904

जाण कायद्याची.. : गृहनिर्माण संस्था: सभासदत्वासाठी शर्ती


Mumbai:

दिलीप चव्हाण

‘‘गृहनिर्माण संस्थेत फ्लॅट, गाळा – सदनिका बुक केली की, ज्याच्या नावाने सदनिका बुक केली आहे, त्या मालकाची जबाबदारी वाढते. सदनिका मिळेल हा एक आनंदच असतो, परंतु ती मिळाल्यावर घेणा-यावर सहकार कायद्यान्वये अनेक अटी-शर्ती, बंधने येतात. त्यातीलच एक महत्त्वाची बाब म्हणजे संस्थेचे सभासदत्वासाठी असलेल्या शर्ती. या शर्ती जरी सोप्या वाटल्या तरी त्या होणा-या प्रत्येक सभासदाने कायद्याने पूर्ण करणे अत्यावश्यक असते.’’

गृहनिर्माण संस्थेच्या जाहिराती ठिकठिकाणी पाहावयास मिळतात. रस्त्यावर फलक, टीव्हीवर, वर्तमानपत्रात इ. माध्यमाद्वारे विकासक जाहिरात करून घर घेणा-याला आकर्षित तर करतातच; परंतु घेणा-याला काय काय आधुनिक सुविधा हव्यात याचासुद्धा पूर्वीच विचार करून जाहिरातीमध्ये सविस्तर खुलासा करतात; म्हणून ज्याच्या त्याच्या आवडी- निवडीनुसार सदनिका घेण्याचे स्वतंत्र आहे.

गृहनिर्माण संस्थेत सदनिका घेऊन ठेवली काय किंवा स्वत: राहण्यास गेलो काय, एकदा का ती आपल्या नावी झाली की सहकार कायदा लागू पडतो. संस्थेचे सदस्य होण्यासाठी सदनिकाधारकांनी कायद्यान्वये असलेल्या शर्ती पूर्ण कराव्या लागतात. तरच त्याला सदस्यत्व दिले जाते.

सदस्य होण्यास पात्र असलेल्या व विहित नमुन्यात सभासदत्वासाठी अर्ज करणा-या कोणत्याही व्यक्तीस तिने कायदेशीर बाबींची शर्तीची पूर्तता केल्यास तिला त्या गृहनिर्माण संस्थेची सदस्य म्हणून कायदेशीर दाखल करून घेता येते. अर्जदाराने सभासदत्वासाठी करावयाच्या अर्जासोबत कमीत कमी दहा भागांची रक्कम पूर्णपणे भरली पाहिजे. अर्जदाराने सभासदत्वासाठी विहित अर्जासोबत १०० रुपये प्रवेश फी म्हणून भरली पाहिजे. संस्थेच्या कार्यकारी क्षेत्रात अन्यत्र कोठेही अर्जदाराचे अगर कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीचे मालकीचे घर, भूखंड अथवा गाळा-सदनिका असल्यास त्याबाबतचा तपशील विहित नमुन्यातील अर्जात व प्रतिज्ञापत्रात त्याने दिला पाहिजे. ज्या कारणासाठी सदनिका-गाळा घेतला असेल त्याच कारणासाठी तो वापरण्यात येईल.

अर्जदाराचे जर का स्वतंत्र उत्पन्नाचे साधन नसेल तर त्याने/तिने त्याबाबत नमुन्यात हमी पत्र दिले पाहिजे. संस्थेच्या सदस्यत्वासाठी महाराष्ट्र मालकी हक्काच्या फ्लॅटच्या अधिनियमामधील कलमान्वये प्रवर्तका (बांधकामदार)बरोबर अथवा हस्तांतरण करणा-या बरोबर केलेल्या आणि विहित मुद्रांक शुल्क भरलेल्या करारनाम्याची सही शिक्क्यासह असलेली, सत्यप्रत सभासदत्वाच्या अर्जासोबत अर्जदाराने जोडणे बंधनकारक आहे. त्या त्या काळी अमलात असलेल्या कोणत्याही कायद्याच्या तरतुदीनुसार आवश्यक असल्याप्रमाणे विहित नमुन्यात हमीपत्रे, घोषणापत्रे आणि संस्थेच्या उपविधीनुसार आवश्यक असलेली अन्य माहिती सभासदत्वाच्या अर्जासोबत अर्जदाराने दिली पाहिजे. जर सिडको/म्हाडा/एसआरए/एमएमआरडीए इ. सारख्या विशिष्ट नियोजन प्राधिकरणा-या अधिकार क्षेत्राखाली संस्था रितसर नोंदणी केलेली असेल, तर संबंधित अधिनियम व शासन/नियोजन प्राधिकरण कोणीही असल्यास यांचे निर्देश यांच्या तरतुदीनुसार अर्जदार ही पात्र व्यक्ती असेल.

संस्थेच्या सभासदत्वासाठी अर्ज करणा-या प्रवर्तकास (बांधकामगार)वर नमूद केलेल्या शर्तीपैकी काही शर्ती लागू असणार नाहीत.

संस्थेच्या सहयोगी सभासदत्वाबाबत शर्ती अशा आहेत की, जर एखादी व्यक्ती, भागीदार पेढी, कंपनी किंवा त्याकाळी अमलात असलेल्या कायद्यान्वये नोंदणी झालेल्या अन्य निगम-निकाय हे सहयोगी सभासद होण्यास पात्र असून त्यांनी अशा सभासदत्वासाठी रु. १०० प्रवेश शुल्क भरून विहित नमुन्यात अर्ज केला असेल, तर अशांना समिती संस्थेचे सहयोगी सभासद करता येते. जे सभासद नाममात्र सभासद होण्यास पात्र आहेत व ज्यांनी अशा सभासदत्वासाठी रु. १०० प्रवेश शुल्क भरून त्यास लागू असलेल्या विहित नमुन्यात आपल्या सभासदामार्फत अर्ज केला आहे, अशा पोटभाडेकरूस, परवानेधारकास किंवा काळजी वाहकास किंवा राहणा-या व्यक्तीस समिती संस्थेचा नाममात्र सभासद करून घेऊ शकेल. संस्थेच्या सदस्यत्वासाठी आलेला अर्ज निकालात काढण्यासाठी संस्थेचे सचिव व समिती कायद्यान्वये दिलेली पद्धत अनुसरावी लागते.

अधिक माहितीसाठी हैसिंग फेडरेशन, सहकार निबंधक किंवा वकिलाचा सल्ला मोलाचा ठरेल.