X Close
X
9819022904

जनता त्रस्त, नेते सत्तेचे गणित मांडण्यात व्यस्त!


Mumbai:

अजय गोरड

राज्यातील विधानसभा निवडणुकीचे निकाल लागून आज १५ दिवस होत आहेत. भाजप-शिवसेना महायुतीला जनतेने स्पष्ट बहुमत दिल्यानंतर महायुतीने अद्याप सत्तास्थापनेचा दावा केलेला नाही. मुख्यमंत्रीपदावरून या दोन पक्षांत सत्तासंघर्ष पेटला असून, तो दिल्ली दरबारी गेल्यानंतरही सुटत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्यात राजकीय नेते एकीकडे सत्तेचे गणित मांडण्यात व्यस्त आहेत, तर दुसरीकडे, अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकरी त्रस्त झाला आहे. काही नेते शेतक-यांच्या बांधावर जाऊन दिलासा देण्याचे काम करत आहेत, पण त्यांचे लक्षही सत्तास्थापनेतील घडामोडीकडेच आहे.

महाराष्ट्रातील जनतेने महायुतीला स्पष्ट बहुमत दिले असल्याने राज्यात सरकार स्थापन यापूर्वीच व्हायला हवे होते. मात्र, युतीतील संघर्ष वेगवेगळ्या कारणांनी कायम आहे. २०१४ साली भाजपने शिवसेनेला धक्का देत युती तोडली. त्यानंतर सर्व प्रमुख पक्षांनी स्वबळावर निवडणूक लढवली. १५ वर्षे काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारविरोधात जनतेचा रोष होता. सोबतच मोदी लाटेच्या जीवावर भाजपने सर्वाधिक १२२ जागा जिंकल्या. मात्र, शिवसेनेला सत्तेत सामावून घेताना दुय्यम स्थान दिले. त्यामुळे दोन्ही पक्षांत पाच वर्षे सूर जुळलेच नाही. शिवसेनेने मोदी-शाहांसह भाजपवर सडकून टीका केली.

अखेर सहा महिन्यांपूर्वी लोकसभा निवडणुकीपूर्वी दोन्ही पक्षांत पुन्हा एकदा युती झाली. त्यावेळी विधानसभा निवडणुकीत समसमान जागावाटप करण्याबरोबर सत्तेचे वाटपही करू, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पक्षाध्यक्ष अमित शाहांच्या उपस्थित माध्यमांसमोर दिले होते. मात्र, आता विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेनेने भाजपला समसमान सत्तावाटपाची आठवण करून दिली आहे, तर भाजप मुख्यमंत्रीपद सोडायला तयार नाही, तर शिवसेना यासाठी अडून बसली आहे. दोन्ही पक्ष कोणत्याही परिस्थितीत माघार घ्यायला तयार नसल्याने आता पंधरवडा झाला असला, तरी सत्ता स्थापन करण्याबाबत कोणताही तोडगा दृष्टीपथात दिसत नाही.

या निवडणुकीत भाजपला १०५, तर शिवसेनेला ५६ जागा मिळाल्या आहेत. मग शिवसेना मुख्यमंत्रीपदावर का अडून बसली आहे, असा प्रश्न उपस्थित होतो. यामागे राज्यात काही राजकारण शिजतंय का? याची खमंग चर्चा आता सुरू झाली आहे. त्यातच शिवसेनेकडून मागील काही दिवस खासदार संजय राऊत जे काही बोलत आहेत, त्याची स्क्रिप्ट पूर्वीच लिहिली आहे काय? अशी शंका यावी, अशी परिस्थिती आहे. संजय राऊत रोज माध्यमांत जाऊन वेगवेगळी वक्तव्ये करत आहेत. आमच्याकडे १७५चे संख्याबळ आहे, असे ते ठासून सांगत आहेत. भाजपवर प्रहार करताना ते एकही संधी सोडत नाहीत. आपण शरद पवारांच्या संपर्कात आहोत, असे जाहीर सांगत आहेत. त्यात गैर काय? असा सवालही करत आहेत. त्यामुळे शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस एकत्र येणार असल्याची चर्चा जोर धरत आहे. त्याचमुळे शिवसेनेने ताणून धरल्याचे सांगितले जात आहे.

शिवसेना आणि राष्ट्रवादीची सरकार स्थापन करण्याबाबत सविस्तर चर्चा झाल्याची माहिती आहे. सर्वाधिक मोठा पक्ष या न्यायाने राज्यपाल भाजपला सरकार स्थापन करण्याचे निमंत्रण देतील. त्यावेळी तुम्ही विरोध करा, आम्ही विरोध करू. मग फडणवीस यांचे सरकार बहुमत सिद्ध न केल्याने आपोआप कोसळेल. त्यानंतर दुसरा मोठा पक्ष म्हणून राज्यपाल तुमच्याकडे विचारणा करतील त्यावेळी तुम्ही सत्ता स्थापनेचा दावा करा, आम्ही पाठिंब्याचे पत्र देऊ, असे आश्वासन शरद पवार व काँग्रेसने दिल्याचे बोलले जात आहे. त्याचमुळे भाजप शिवसेनेशी कोणत्याही प्रकारे संपर्क साधला नसतानाही शिवसेना ‘रिलॅक्स’ मूडमध्ये दिसत आहे.

राज्यातील जनमत भाजपविरोधात आहे. शिवसेनेने आमच्याकडे पाठिंबा मागितला नाही, असे सांगत भविष्यात काय होईल सांगता येत नाही, असे वक्तव्य शरद पवार यांनी दिल्लीत केले. तेही पुरेसे बोलके आहे. शरद पवार यांना भाजपला कोणत्याही परिस्थितीत सत्तेपासून दूर ठेवायचे आहे. २०१४ साली भाजपला न मागता बिनशर्त पाठिंबा देऊन शिवसेनेचे नुकसान केले. आता भाजप वेगाने घौडदौड करू लागल्याने त्याला ‘ब्रेक’ लावण्यासाठीच पवार फासे टाकत आहेत.

भाजप श्रेष्ठींनी महाराष्ट्रातील सत्ता स्थापनेबाबत अजून फारसे लक्ष घातले नाही. फडणवीस यांच्याबाबत पक्षांतर्गत नाराजी असल्याची चर्चा आहे. पक्षांतर्गत विरोधक, शिवसेना आणि मित्रपक्षांना फडणवीस यांनी चांगलाच ‘लगाम’ लावल्याने त्यांच्या बाजूने कुणीही उतरताना दिसत नाही. रामदास आठवले, महादेव जानकर, रवी राणा यांच्यासारखे पक्षाबाहेरील व दुय्यम नेते फडणवीस यांना मुख्यमंत्री बसवावे असे बोलत आहेत. भाजप श्रेष्ठींनीही राज्यस्तरावर हा विषय सोडवावा म्हणून आपले अंग काढून घेतले आहे.

१५ दिवसानंतरही सत्तेची कोंडी फुटत नसल्याचे चित्र आहे. अशा परिस्थितीत नितीन गडकरींना महाराष्ट्रात पाठवण्याचा निर्णय मोदी-शाह घेतील काय? हा प्रश्न आहे. निकाला १५ दिवस झाल्यानंतर राज्यात सत्ता स्थापन होत नसल्याने अस्थिरता आहे. अवकाळीने राज्यातील शेतकरी मोडून पडला आहे. शरद पवार, देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे यांच्यासारखे प्रमुख नेते शेतक-यांच्या बांधावर जात आहेत. मात्र, त्यांचेही डोळे सत्ता स्थापनेकडे लागलेले आहेत.