X Close
X
9819022904

चंद्रावर विक्रम लँडर सुस्थितीत आणि सुरक्षित, संपर्काची आशा : सीवन


chandrayan2-vikram-lander

ऑर्बिटरने पाठवले फोटो; कोणतीही हानी झालेली नाही

बंगळुरू : चांद्रयान-२ मोहिमेत फक्त २ किमी अंतर राहिले असताना विक्रम लँडरशी संपर्क तुटला होता. विक्रम लँडर सापडले असल्याचे रविवारी इस्त्रोने स्पष्ट केले होते. आता इस्रोने आणखी एक आनंदाची बातमी दिली असून विक्रम लँडर सुस्थितीत आणि पूर्णपणे सुरक्षित असल्याचे सांगितले आहे. इस्त्रोच्या शास्त्रज्ञांनी याबाबतची माहिती दिली आहे.

चंद्रावर लँडर उतरवताना हार्ड लँडिंग झाले असण्याची शक्यता आहे. मात्र ऑर्बिटरने पाठवलेल्या फोटोवरून विक्रम लँडर पुर्णपणे सुरक्षित असल्याचे समोर आले आहे. लँडरचे तुकडे होण्याची भिती व्यक्त केली जात होती. मात्र तसे काही झालेले नसल्याचे इस्त्रोच्या अधिका-यांनी सांगितले आहे. विक्रम लँडरशी संपर्क साधण्याचे सर्वतोपरी प्रयत्न केले जात असल्याचेही त्यांनी सांगितले.

भारताच्या चांद्रयान-२ मोहिमेला अखेरच्या क्षणी अडथळा आला आणि विक्रम लँडर चंद्रापासून २ किलोमीटर अंतरावर असताना त्याचा संपर्क तुटला होता. इस्त्रोच्या शास्त्रज्ञांना अपेक्षित असे यश या मोहिमेला मिळाले नसले तरी ही मोहिम अयशस्वी ठरली असे म्हणता येणार नाही. इस्त्रोच्या सर्व संशोधकांनी केलेली मेहनत वाया गेलेली नाही. संपर्क तुटला असला तरी चांद्रयान मोहिम पुढचे एक वर्ष सुरू राहणार आहे. चांद्रयान-२ चे लँडर आणि रोव्हरशी संपर्क तुटला आहे. पण चंद्राच्या कक्षेत चांद्रयान-२ चे ऑर्बिटर त्याचे काम करत आहे. ऑर्बिटरच्या माध्यमातून फोटो इस्त्रोला मिळत राहतील.

शास्त्रज्ञांनी सांगितले होते की, लँडरशी संपर्क तुटल्याने मोहिमेला ५ टक्के इतकाच धक्का बसला आहे. तर ९५ टक्के काम सुरू राहणार आहे. ५ टक्क्यांमध्ये लँडर विक्रम आणि रोव्हर प्रज्ञान यांच्याशी संपर्क तुटला आहे. यामुळे चंद्राच्या पृष्ठभूमीची माहिती मिळणार नाही. मात्र ऑर्बिटरच्या सहाय्याने इतर माहिती मिळत राहणार आहे. चांद्रयान-२ चा ऑर्बिटर चंद्राभोवती फिरत राहणार आहे.

ज्या रोव्हरचा संपर्क तुटला आहे तो चंद्राच्या भूमीवर उतरल्यानंतर फक्त १४ दिवस काम करू शकतो. तर ऑर्बिटर मात्र एक वर्षभर काम करत राहणार आहे. ऑर्बिटर चंद्राचे अनेक फोटो काढून इस्त्रोला पाठवणार आहे. ऑर्बिटरकडून लँडरची माहिती सुद्धा मिळवता येईल. ऑर्बिटरने लँडर विक्रमचे फोटो पाठवल्यानंतर त्याचे विश्लेषण केल्यानंतर नेमके कारण समजू शकेल.

ऑर्बिटरने पाठवलेल्या फोटोनुसार, ठरलेल्या जागेपासून खूप जवळच हे हार्ड लँडिंग झाले आहे. हा संपूर्ण लँडर एकसंध असून त्याचे तुकडे झालेले नाहीत. फक्त हा लँडर एकाबाजूला झुकलेला आहे. चंद्राच्या कक्षेत फिरत असलेल्या ऑर्बिटरने पाठवलेला फोटो आणि अन्य डेटाच्या विश्लेषणावरुन ही माहिती समोर आली आहे. लँडर सापडला असला तरी त्याच्याशी अजून संपर्क होऊ शकलेला नाही. पुढचे १४ दिवस संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जाईल, असे इस्रोकडून सांगण्यात आले आहे.

लँडरशी पुन्हा संपर्क करण्यासाठी आम्ही आमच्यापरीने सर्व प्रयत्न करत आहोत असे या अधिका-याने सांगितले. इस्रोच्या आयएसटीआरएसी सेंटरमध्ये एक टीम यासाठी सतत काम करत आहे. चांद्रयान-२ मध्ये ऑर्बिटर, लँडर आणि रोव्हर असे तीन भाग आहेत. २ जुलैला श्रीहरीकोट्टा येथून अवकाशात झेपावल्यानंतर २ सप्टेंबरपर्यंत ऑर्बिटर, लँडर आणि रोव्हर एकत्र होते. २ सप्टेंबरला चंद्राच्या अपेक्षित कक्षेत पोहोचल्यानंचतर लँडर आणि रोव्हर ऑर्बिटरपासून वेगळे झाले.

विक्रम स्वत:च्या पायावर उभे राहणार; इस्रो इतिहास रचणार

इस्रोची चांद्रयान-२ मोहीम पूर्णपणे यशस्वी होण्याची आशा अद्यापही कायम आहे. चंद्रापासून २.१ किलोमीटर अंतरावर गेल्यावर लँडर विक्रमशी तुटलेला संपर्क पुन्हा प्रस्थापित केला जाऊ शकतो. विक्रमचे सॉफ्ट लँडिंग अपयशी ठरले असले, तरीही ते स्वत:च्या पायावर उभे राहू शकते. इस्रोला विक्रमशी संपर्क साधण्यात यश आल्यास भारताच्या नावावर ऐतिहासिक कामगिरीची नोंद होईल.

चांद्रयान-२ च्या लँडर विक्रममध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान असल्याची माहिती इस्रोतील विश्वसनीय सूत्रांनी दिली. या तंत्रज्ञानामुळे विक्रम लँडर स्वत:हून उभे राहू शकते. मात्र त्यासाठी प्रथम विक्रमशी संपर्क प्रस्थापित व्हायला हवा. विक्रमशी संपर्क साधण्यात यश आल्यास त्याला इस्रोकडून सूचना पाठवल्या जाऊ शकतात. त्यानंतर विक्रम स्वत:हून चंद्राच्या पृष्ठभागावर उभे राहू शकेल

लँडर विक्रममध्ये ऑनबोर्ड कॉम्प्युटर आहे. त्यामुळे विक्रम अनेक काम स्वत:हून करते. विक्रमचे सॉफ्ट लँडिंग अपयशी ठरल्याने त्याचा एँटिना दबला आहे. त्यामुळे त्याच्याशी संपर्क साधण्यात अडचणी येत आहेत. या एँटिनाच्या माध्यमातून संपर्क साधण्यासाठी इस्रोचे प्रयत्न सुरू आहेत. यात यश आल्यास विक्रमला सूचना पाठवल्या जाऊ शकतील. त्यामुळे विक्रम स्वत:च्या पायावर उभे राहू शकेल

इस्रोतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लँडर विक्रमच्या खालील भागात पाच थ्रस्टर्स आहेत. याच थ्रस्टर्सच्या मदतीने चंद्रावर सॉफ्ट लँडिंग केले जाणार होते. याशिवाय इस्रोच्या चारही बाजूंना थ्रस्टर्स आहेत. याच थ्रस्टर्सनी अंतराळात विक्रम लँडरला दिशा देण्याचे काम केले. हे चारही थ्रस्टर्स अद्याप सुरक्षित आहेत. सध्या लँडरवरील कम्युनिकेशन एँटिना दबलेल्या अवस्थेत आहे. त्याही भागात थ्रस्टर्स आहेत

इस्रोच्या ग्राऊंड स्टेशनवरुन पाठवण्यात आलेल्या सूचना ऑर्बिटरच्या माध्यमातून एँटिनापर्यंत पोहोचल्यास थ्रस्टर्स ऑन होऊ शकतात. त्यानंतर विक्रम स्वत:च्या पायावर उभे राहू शकेल. इस्रो यामध्ये यशस्वी ठरल्यास चांद्रयान-२ मोहिमेसंदर्भातील सर्व प्रयोग ठरल्याप्रमाणे करणे शक्य होईल. यामुळे इस्रोच्या नावावर ऐतिहासिक कामगिरीची नोंद होईल. चंद्राच्या दक्षिण धुव्रावर उतरणारा पहिला देश होण्याचा मान यामुळे भारताला मिळेल.

(PRAHAAR)