X Close
X
9819022904

कोळंब पुलाच्या कामाचा महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाने केला पर्दाफाश


15-mlv-002-1-696x392

मालवण: सागरी महामार्गावरील कोळंब पुलाच्या दुरुस्तीसाठी शासनाने तब्बल ८ कोटी रुपये मंजूर केले असून हे काम सध्या पुर्णत्वाकडे जात आहे. मात्र याठिकाणी शासनाच्या निधीचा मोठ्या प्रमाणात गैरवापर होत असून निकृष्ट दर्जाने सुरु असलेल्या कोळंब पुलाच्या कामाचा महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाने बुधवारी पर्दाफाश केला. याठिकाणी जुन्या शिगांना सिमेंटचा लेप लावण्यात येत असून बांधकामात वापरण्यात येत असलेल्या सळ्या देखील निकृष्ट दर्जाच्या आहेत. या पुलाचे काम करणाऱ्या ठेकेदाराचे आमदार वैभव नाईक यांच्याशी साटेलोटे असल्याचा आरोप स्वाभिमानचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत आणि तालुकाध्यक्ष मंदार केणी यांनी करत या कामाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली आहे. पुलाच्या बाजूला भराव टाकण्यासाठी पर्यावरण विभागाची ठेकेदाराने कोणतीही परवानगी घेतली नसून याचीही चौकशी करण्याची मागणी शासनाकडे केली जाणार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

कोळंब पुलाच्या दुरुस्तीबाबत ग्रामस्थांमधून शंका व्यक्त करण्यात आल्यानंतर महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी बुधवारी सकाळी याठिकाणी भेट देऊन कामाची पहाणी केली. यावेळी अशोक सावंत, मंदार केणी यांच्यासह दाजी सावजी, संदीप भेजणे, प्रियाल लोके, बाबा मडये आदी उपस्थित होते. यावेळी सदरील पुलाचे काम निकृष्ट पद्धतीने होत असल्याचे समोर आले आहे. पुलाच्या दुरुस्तीचे काम करताना जुन्या गंजलेल्या सळ्या काढणे आवश्यक होते. मात्र या नळ्या तशाच ठेऊन त्यावर सिमेंटचा लेप लावण्यात आला आहे. प्लास्टरचे कामही ओबडधोबड असल्याने ते टिकण्याची शक्यता कमी असल्याचे दिसून आले. यावेळी पुलाच्या खालील भागात केलेल्या कामावरुन संबंधित ठेकेदारास स्वाभिमानच्या पदाधिकाऱ्यांनी चांगलेच धारेवर धरले. मात्र त्याला समाधानकारक उत्तरे देता न आल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी प्रदीप पाटील यांना याठिकाणी पाचारण करुन चुकीच्या पद्धतीने होत असलेल्या कामाची माहिती देण्यात आली. आमदार वैभव नाईक यांच्याशी ठेकेदाराचे साटेलोटेच असल्याने या पुलाचे काम निकृष्ट दर्जाचे होत असून आमदार वैभव नाईक हे काम दर्जेदार पद्धतीने होण्यासाठी नव्हे तर ठेकेदाराला त्रास होऊ नये यासाठी येथे भेट देत असल्याचा आरोप अशोक सावंत आणि मंदार केणी यांनी केला. या कामाची उच्चस्तरीय चौकशीची मागणी शासनाकडे केली जाणार असून पर्यावरण विभागाची परवानगी न घेता पुलाच्या बाजुने मातीचा भराव टाकल्याबाबतही चौकशीची मागणी करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

आ. वैभव नाईक यांची डेडलाईन पुन्हा चुकली ?

मागील आठवड्यात कोळंब पुल दुचाकींसाठी सुरु झाल्याचे समजताच आमदार वैभव नाईक यांनी याठिकाणी फोटोसेशन करुन येत्या चार ते पाच दिवसात पुलावरुन सर्वप्रकारची वाहतूक स्वत: उभी राहून करुन घेणार असल्याची भिमगर्जना केली होती. त्यानुसार हे काम तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी ठेकेदारास दिल्या. मात्र ठेकेदाराने आमदारांच्या सूचनेला वाटाण्याच्या अक्षता दाखविल्याचे स्पष्ट झाले आहे. हा पूल बुधवार पासून सर्वप्रकारच्या वाहतूकीसाठी खुला होणार होता. मात्र अद्याप काम अपूर्ण असल्याने २५ मे पर्यंत या कामाला मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती ठेकेदाराने दिली. या विषयावरुन स्वाभिमानच्या पदाधिकाऱ्यांनी आमदारांवर टिका केली असून आ. नाईक पुलावरुन वाहतूक खुली होण्यासाठी सातत्याने तारखा देऊन जनतेची फसवणूक करत आहेत. पर्यटन, मत्स्यव्यवसाय, आंबा, वाळू व्यावसायिकांच्या व्यवसायाचे या पुलाच्या रखडलेल्या दुरुस्तीमुळे मोठे नुकसान झाले असून आमदार वैभव नाईक यांनी कोळंब पुलावर येऊन पंचक्रोशीतील जनतेची माफी मागावी, अशी मागणी मंदार केणी यांनी केली.

(PRAHAAR)