X Close
X
9819022904

कोणत्याही क्षणी चिदंबरम यांच्या अटकेची शक्यता; लूक आऊट नोटीस जारी, राजकीय द्वेषापोटी कारवाई केली जात असल्याचा काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी-वढेरा यांचा आरोप


Chidambaram

नवी दिल्ली : आयएनएक्स मीडिया घोटाळा आणि मनी लाँड्रिंग, भ्रष्टाचारप्रकरणी माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना दिल्ली उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर अटकेची टांगती तलवार असलेल्या पी. चिदंबरम यांना सर्वोच्च न्यायालयाकडूनही तूर्तास दिलासा मिळू शकला नाही. या प्रकरणावर आज (बुधवारी) सर्वोच्च न्यायालयात न्या. रमण्णा यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. त्यांनी या प्रकरणी कोणतेही आदेश दिले नाहीत. हे प्रकरण त्यांनी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्याकडे पाठवले आहे. त्यामुळे आता चिदंबरम यांचे भवितव्य सरन्यायाधीशांच्या हाती आहे. सध्या सरन्यायाधीश अयोध्या प्रकरणी सुनावणी घेत आहेत, त्यानंतर चिदंबरम यांच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे. आता या प्रकरणी सरन्यायाधीश कोणता निर्णय देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दिल्ली उच्च न्यायालयाने मंगळवारी अटकपूर्व जामीन नाकारल्यानंतर चिदंबरम यांचे वकील कपिल सिब्बल यांनी सर्वोच्च न्यायालयात स्पेशल लिव्ह पेटिशन (एसएलपी) दाखल केली होती. अटकेपासून अंतरिम संरक्षण मिळावे यासाठी ही याचिका दाखल करण्यात आली होती. यावेळी कोर्टात चिदंबरम यांच्यावतीने वरिष्ठ विधीज्ञ कपिल सिब्बल, सलमान खुर्शिद आणि विवेक तनखा हे बाजू मांडत आहेत.

पी. चिदंबरम सीबीआयच्या पथकाला सापडले नाहीत

दरम्यान, चिदंबरम यांना ताब्यात घेण्यासाठी त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी आज (बुधवारी) सकाळी सीबीआयची टीम पोहोचली मात्र, ते घरात उपलब्ध नसल्याने सीबीआयला रिकाम्या हाती परतावे लागले. त्यामुळे चिदंबरम यांना अटक होण्याची दाट शक्यता आहे. मंगळवारपासून चिदंबरम बेपत्ता असल्याने त्यांच्याविरोधात तपाय यंत्रणांनी लूकआऊट नोटीसही बजावली आहे. चिदंबरम यांच्याविरोधात सीबीआयकडून आयएनएक्स मीडिया प्रकरणात भ्रष्टाचारप्रकरणी तर ईडीकडून आर्थिक घोटाळा प्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, काँग्रेसने चिदंबरम यांच्यावरील कारावाईबाबत भाजपावर निशाणा साधला आहे. राज्यसभेचे खासदार असलेले पी. चिदंबरम हे अत्यंत हुशार आणि आदरणीय व्यक्तीमत्व आहे. त्यांनी केंद्रीय अर्थमंत्री आणि गृहमंत्री म्हणून अनेक दशकांपासून देशाची प्रामाणिकपणे सेवा केली आहे. त्याचबरोबर त्यांनी खरे बोलताना मोदी सरकारची पोलखोल सुरु केल्यानेच त्यांच्यावर राजकीय द्वेषापोटी कारवाई केली जात आहे, असा आरोप काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी-वढेरा यांनी केला आहे.

(PRAHAAR)