X Close
X
9819022904

केरळचा मजूर रातोरात झाला कोटय़धीश


Mumbai:

लॉटरीने नशीबच बदलले

कन्नूर : देशभरात लाखो लोक मजुरीची कामे करत आपल्या संसाराचा गाडा कसाबसा हाकत असतात. महागाईच्या काळात त्यांचा जीव मेटाकुटीला आलेला असतो. केरळमध्ये राहणारे पेरून्नन राजन हे असेच रोजंदारीवर काम करणारे मजूर. मात्र, गेल्या १० फेब्रुवारीला घडलेल्या एका घटनेमुळे या मजुराचे संपूर्ण आयुष्यच बदलून गेले. रोज मोलमजुरी करून पोट भरणा-या पेरून्नन यांना एक, दोन नव्हे, तब्बल बारा कोटींची लॉटरी लागली आहे. करापोटी रक्कम कपात करून त्यांच्या खात्यात सात कोटी रुपयांची रक्कम जमा झाली. आपण एका रात्रीत करोडपती झालो आहोत, यावर आपला विश्वासच बसत नसून, हे एक स्वप्न आहे, असेच आपल्याला वाटत असल्याची प्रतिक्रिया भारावून गेलेल्या राजन पेरून्नन यांनी व्यक्त केली आहे.

५८ वर्षीय राजन पेरून्नन हे मलूरमधील थोलांबरा येथे राहतात. ते रोजंदारीचे काम करून आपल्या कुटुंबाचे पोट भरतात. कुटुंबाची आर्थिक स्थिती खालावलेली असतानाही ते न चुकता लॉटरीचे तिकीट विकत घेत असत. आपले भाग्य कधी ना कधी चमकणारच याचा त्यांना पूर्ण विश्वास होता.

आपल्याला इतके मोठे यश मिळेल याचा आपण स्वप्नात देखील विचार केला नव्हता, अशी लॉटरी लागल्यानंतर राजन यांनी प्रतिक्रिया दिली. लॉटरीचे निकाल घोषित झाले. मात्र, त्यात आपण विजेता असू असे मला कधीच वाटले नव्हते. मात्र, जेव्हा आपण आपल्या कुटुंबीयांसह या निकालाची पडताळणी केली तेव्हा माझ्या आनंदाला पारावार राहिला नाही, असे राजन म्हणाले. हे लॉटरीचे तिकीट बँकेत जमा करण्यापूर्वी आपण निकालाची अनेकदा पडताळणी करून पाहिली, असेही राजन यांनी सांगितले.

लॉटरी लागल्यानंतर राजन यांनी प्रथम थोलांबरी को-ऑपरेटिव्ह बँकेशी संपर्क साधला. त्यानंतर बँकेच्या अधिका-यांनी त्यांना कन्नूरच्या जिल्हा बँकेत जाण्यास सांगितले. त्यानंतर राजन हे आपली पत्नी रजनी, मुलगा रिगिल आणि मुलगी अक्षरा यांच्यासह बँकेत गेले आणि तिथे त्यांनी बँकेला लॉटरीचे तिकीट दिले आणि त्यांच्या बँक खात्यात कर कापून पैसे जमा झाले.