X Close
X
9819022904

केंद्र सरकारकडे भीक का मागता?


Mumbai:

माजी खासदार निलेश राणेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल

मुंबई : राज्यात गेल्या महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतक-यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील अडचणीत असलेल्या शेतक-यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारकडे मदत मागितली आहे. केंद्राने दोन वर्षासाठी महसूल माफ केला तर महाराष्ट्र कर्जमुक्त होईल, अशी मागणी उद्धव यांनी केली होती. यावरुनच भाजपाचे नेते निलेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांना पोरकट म्हटले आहेत. तसेच केंद्राकडे महसूल माफीची भीक कशाला मागता असा सवालही निलेश यांनी उपस्थित केला आहे.

राज्यातील शेतक-यांना मदत देण्यासंदर्भात मुख्यमंत्री ठाकरे यांनी मागणी केली आहे. यासंदभार्तील माहिती त्यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. राज्यातील शेतक-यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने मदत करायला हवी. विरोधी पक्षातील नेत्यांनीही यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घ्यावी. राज्यातील शेतक-यांना मदत देण्यासाठी आर्थिक साहाय्य करण्याची मागणी त्यांनी करावी, असेही मुख्यमंत्री ठाकरे यावेळी म्हणाले होते.

मुंबई केंद्राला ३६ ते ४० टक्के महसूली कर देते. उर्वरित महाराष्ट्र चार टक्के कर केंद्राला देतो. एकंदरित महाराष्ट्र ४० ते ४४ टक्के कर केंद्राला देतो. मात्र याबदल्यात केंद्र महाराष्ट्राला काय देते हा मोठा प्रश्न आहे. माझ्या अंदाजाप्रमाणे किमान दीड ते पावणे दोन लाख कोटी रुपये महसूल केंद्राला महाराष्ट्रातून जातो. हे कायद्यात बसते की नाही मला ठाऊक नाही पण फक्त दोन वर्षासाठी हा महसूल माफ केल्यास माझे राज्य कर्जातून बाहेर पडू शकते, असे मत उद्धव यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले होते.

मात्र दोन वर्षे महसूल रद्द करण्याच्या मुद्द्यावरुन निलेश राणेंनी उद्धव यांना ट्विटवरुन टोला लगावला आहे. ‘काय पोरकट मुख्यमंत्री आहे. प्रत्येक राज्यातून जो महसूल जातो तो केंद्र सरकार परत वेगवेगळ्या मार्गाने राज्यातच पाठवतात. मागायचे असेल तर महाराष्ट्र ज्या प्रमाणात महसूल पाठवतो त्याच प्रमाणात राज्यात परत आला पाहिजे ही मागणी करा. भीक का मागताय?’ असे ट्विट निलेश यांनी केले आहे.

याच विषयावरुन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधान सभेमध्ये हेक्टरी २५ हजार रुपये मदत देण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. राज्यात जो अवकाळी पाऊस झाला. त्यात शेतक-यांचे, मासेमारी करणा-यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अवकाळी पावसामुळे शेतक-यांचे नुकसान झाले आहे. त्यांना तत्काळ २५ हजार रुपये हेक्टरी मदत देण्यात यावी. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वत: तशी मागणी केली होती. ती आता त्यांनी त्वरेने पूर्ण करावी आणि बळीराजाला दिलासा द्यावा, अशी मागणी फडणवीस यांनी केली.