X Close
X
9819022904

कावळोबा


akshay 24-4-17

रमेश तांबे

एक होता कावळा. त्याचं नाव होतं आळसोबा. कारण तो होता खूप खूप आळशी. खाल्लं तर खाल्लं नाही तर उपाशी. दिवसभर नुसताच उनाडक्या करायचा आणि फांदीवर बसून कावकाव करायचा.

कावळ्याला त्याचं घर नव्हतं. फांदीवर बसायला मित्रही नव्हते. काम तर काहीच करायचा नाही. पण कुणाच्याही घरात उगाचच घुसायचा. चिमणीच्या घरट्यात जा तिला त्रास दे. पोपटाच्या डोलीत शीर; नुसताच बघत बस. सुगरणीच्या खोप्यावर बस आणि छान झोके घे. तर कुणाच्या शेजारी बसून फुकटची कावकाव कर. सगळे पक्षी त्याला वैतागले होते. पण काय करायचे कुणालाच कळत नव्हते.

काम न करता कावळ्याला काहीच खायला मिळेना. नुसतेच पाणी पिऊन त्याचे पोट भरेना आणि पाणीदेखील किती दिवस पिणार. मग त्याला एक युक्ती सुचली. त्याने केले एक नाटक आणि त्याचीच त्याला लागली चटक. मग तो अगदी रडका चेहरा करून चिमणीकडे गेला. अन् चिमणीला म्हणाला; चिमणी चिमणी तुझं काम थांबव अन् माझं ऐक. सकाळपासून खूप डोकं दुखतंय बघ. डॉक्टर म्हणाले काकडी खा म्हणजे डोकं दुखायचं थांबेल. तुझ्याकडे ती काकडी आहे ना तीच माझं औषध आहे. अगं चिमणीताई दे ना मला काकडी! कावळ्याचं बोलणं ऐकून चिमणीला त्याची दया आली. मग तिने तिच्या जवळची काकडी कावळ्याला दिली. आळशी कावळ्याने लांब जाऊन एका फांदीवर बसून ती मिटक्या मारीत खाल्ली. स्वतःच्याच हुशारीवर कावळा मात्र खूप खूश झाला.

दुसऱ्या दिवशी कावळा गेला पोपटाकडे अन् म्हणाला, पोपटदादा पोपटदादा अहो माझं पोट खूप दुखतंय. कालपासून पोटात माझ्या काही तरी खूपतंय. डॉक्टर म्हणाले पेरू खायला हवा. तरच पोट दुखायचं थांबेल. पोपटदादा तुमच्याकडचा तो पेरू द्या ना मला. मग पोपटाने कावळ्याला पेरू दिला. कावळ्याने पेरू मोठ्या आनंदाने उचलला आणि पंख पसरून आकाशात उडाला. नंतर त्याने अगदी सावकाशीने हसत हसत पेरू खाल्ला.

तिसऱ्या दिवशी कावळा विचार करू लागला आज कुणाला फसवायचे. आज काय बरे खायचे! तेवढ्यात त्याला दिसला गरुड. गरुडाच्या चोचीत होता एक मासा. मासा बघताच कावळ्याच्या तोंडाला पाणी सुटले. तसा तो गरुडाच्या मागे उडत निघाला. गरुडाच्या जवळ जाताच कावळा म्हणाला… हे पक्ष्यांच्या राजा आम्ही आहोत तुझी प्रजा. आधी माझं ऐका मग करा तुम्ही मजा! अरे गरुडा माझी चोच फार दुखतेय रे. डॉक्टर म्हणाले चोचीला माशाचं तेल लाव. कालपासून मी उपाशीच झोपतोय. कधीपासून माशाचं तेल शोधतोय. बरं झालं तुझ्याकडे मासा आहे. मला तो मासा दे ना. कावळ्याचा रडका चेहरा बघून गरुडाला त्याची खूप दया आली. मग गरुडाने कावळ्याला मासा दिला. तो कावळ्याने पटकन गिळला.

मग काय कावळा रोज एकाला फसवायचा. अन् काम न करता बसून खायचा. पण हे किती दिवस चालणार. कोण किती दिवस खपवून घेणार.
एके दिवशी सर्व पक्ष्यांची सभा भरली. सगळ्यांनी कावळ्याला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं. सभेने त्याची चांगलीच खरडपट्टी काढली. चिमणी म्हणाली, मी किती लहान पण दिवसभर काम करते. सुगरण म्हणाला, माझं घरटं किती छान. ते बांधण्यासाठी मी किती कष्ट करतो अन् हा आळशी कावळा साधं घरसुद्धा बांधत नाही. पोपट म्हणाला, याला नुसतं बसून खायची सवय लागलीय. प्रत्येकजण कावळ्याला दोष देऊ लागला. सगळ्यांनी एकच चिवचिवाट केला. शेवटी सगळ्या पक्ष्यांनी मिळून कावळ्याची जंगलातून हकालपट्टी केली. अगदी कायमचीच!
तेव्हापासून कावळा माणसांसोबत राहातो. माणसांनी फेकलेले शिळे, उष्टे अन्न खातो आणि दिवसभर आपल्या कर्कश आवाजात काव काव करीत बसतो. आता तर माणसेही कावळ्याला हाकलून लावतात. कळले मित्रांनो, खोट्याच्या कपाळी नेहमी गोटा बसतो म्हणून ‘आपण नेहमी खरे बोलावे!’

(PRAHAAR)