X Close
X
9819022904

एमपीएससी विद्यार्थ्यांची ‘तोतयागिरी’


board-exams11032019033824

हॅलो मॅडम, नमस्कार, तुमची पाच मिनिटे घेतो. मी एमपीएससीचा विद्यार्थी आहे. पण आता अडचणी सापडल्याने तुम्हाला फोन केला आहे. माझी आई पुण्यातील बाणेर येथील खासगी हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमिट आहे. थोडी पैशांची गरज आहे. आपण वैद्यकीय मदत करता असे ऐकले होते म्हणून ओळख नसतानाही तुम्हाला फोन केला. प्लीज, मला मदत करा’ असा कळकळीची विनंती करणारा, मदतीसाठी याचना करणारा कॉल होता मुकेश राठोडचा. पुण्यातील आमदार माधुरी मिसाळ यांनी माणुसकीच्या नात्यातून त्याला मदत करण्याचे तत्काळ सौजन्य दाखवले. मुकेश हा त्यांच्या मतदारसंघातील नव्हता, ना पुणे शहरातील. तरीही आईच्या आजारपणाचे कारण ऐकल्यानंतर आमदार मिसाळ यांनी मुलीच्या मोबाइलवरून गुगल पेद्वारे मुकेशच्या खात्यात ३४०० रुपये ट्रान्सफर केले.

माधुरी मिसाळ काही कामानिमित्त मुंबईला गेल्या होत्या. दरम्यान, देवयानी फरांदे, मेघना साकोर, मेघना बोर्डीकर, श्वेताताई महाले या महिला आमदार एकमेकांशी चर्चा करत होत्या. या चर्चेतून मुकेश राठोड या नावाने फोन करून अन्य महिलांना पैशांची मागणी केल्याची बाब त्यांच्या निदर्शनास आली. एमपीएससीचे विद्यार्थी असल्याची सांगून आपली दिशाभूल केल्याची बाब मिसाळ यांच्या जिव्हारी लागली. त्यांनी खोटे बोलून पैसे का मागितले? हा प्रश्न त्यांना पडला. याबाबत त्यांनी तक्रार करण्याचा निर्णय घेतला. पुणे शहराच्या सायबर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. यानंतर पुण्यातील बिबवेवाडी पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करून तपास सायबर क्राइमकडे सोपवला. त्याचबरोबर याच कालावधीत पुण्यासह राज्यातील ४ महिला आमदारांची फसवणूक झाल्याची घटना उघडकीस आली. या प्रकरणी आधी महिला आमदारांनी सायबरकडे तक्रारी केल्या. मात्र नंतर बिबवेवाडी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या सर्व प्रकरणाचा तपास एकत्रित सुरू झाला. ज्या गुगल पे नंबरवर पैसे ट्रान्सफर करण्यात आले होते. त्या मोबाइल नंबरवरून त्या तरुणाचा पोलिसांनी शोध घेतला. त्याचे बँक खाते क्रमांक, पत्ता सर्व पोलिसांकडे प्राप्त झाला होता. त्यानंतर ऑनलाइन फसवणूक केल्याप्रकरणी पुणे पोलिसांच्या सायबर विभागाने औरंगाबाद येथील एमपीएससीच्या दोन विद्यार्थ्यांना ताब्यात घेतले.

यातील मुख्य आरोपी मुकेश राठोड हा बुलढाणा जिल्ह्यातील रहिवासी असून, तो बीए पदवीधर आहे. त्यानंतर त्याने एमपीएससीच्या माध्यमातून पीएसआयची परीक्षाही दिली असून पुढील शिक्षणाची तयारी करत होता. त्याने वापरलेला गुगल पे नंबर त्याच्यासोबत परीक्षेची तयारी करणाऱ्या एका विद्यार्थ्याचा होता. तो बीएससी झालेला असून औरंगाबादचा रहिवासी आहे. हे दोघेही एमपीएससीचे विद्यार्थी आहेत. या दोघांनाही खर्चासाठी पैशांची गरज होती. त्यामुळे या दोघांनी मिळून या चार आमदारांना खोटे बोलून पैसे मागितल्याचे तपासात निष्पन्न झाले. वैद्यकीय कारण सांगितल्यावर पैसे मिळतात म्हणून मुकेशने याच कारणावरून रोजच्या खर्चासाठी लागणारे पैसे कसे मिळवावेत, याचा फंडा शोधून काढला होता. त्यासाठी गुगलवरून आमदार, खासदार, मंत्री, काही प्रतिष्ठित व्यक्ती याचे नंबर शोधून काढले होते. आमदार मंडळी वैद्यकीय कारणासाठी हमखास मदत करतात, हे दोघांनाही माहीत होते. मात्र पुण्यात तक्रार दाखल झाल्यानंतर या दोघांनी पुणे शहर सोडले होते. त्यांना तक्रार झाल्याची कुणकुण लागली होती. अखेर पोलिसांनी औरंगाबाद येथून दोघा आरोपींना ताब्यात घेण्यात यश मिळविले. दोघे तरुण विशेषत: शेतकरी कुटुंबातील आहे. घरची परिस्थिती बेताची आहे. मात्र भविष्यात चांगली सरकारी नोकरी मिळावी यासाठी दोघेही औरंगाबाद येथे मित्राकडे राहून परीक्षेची तयारी करत होते. विशेषत: महिला आमदारांना लोकांप्रती मदत करण्याची चांगली भावना असते. थोड्या कौटुंबिक अडचणी सांगितल्या, तर त्यांना पाझर फुटू शकेल, हे दोघांनी हेरले होते. याच कपोलकल्पित गोष्टी सांगून ते पैशाची मागणी करत राहिले. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांनाही त्यांच्या या तोतयागिरीची कीव आली. एका व्यक्तीकडे या तरुणांनी मागितलेली रक्कम ही दहा हजार रुपयांच्या घरात होती. सर्वसाधारणपणे ही रक्कम कदाचित सत्य परिस्थिती सांगून पैसे मागितले असते, तर गुन्हा दाखल करण्याचा प्रश्न नव्हता. पण आता तक्रारीनुसार फसवणूक झाली, ही गोष्ट कोणीही नाकारू शकत नाही. मात्र दोघांनी या मोडस ऑपरेंडीनुसार आणखी कितीजणांकडून पैसे उकळले आहेत, याचा तपास बिबवेवाडी पोलीस करत आहेत.

तात्पर्य : महाराष्ट्र लोकसेवा आयोग किंवा तत्सम स्पर्धा देऊन प्रशासन सेवेत कार्यरत होण्याची स्वप्ने बाळगणाऱ्या मुकेश राठोड आणि त्याच्या मित्राने आजची खडतर परिस्थितीतून पैसे मिळविण्यासाठी तोतयागिरीचा मार्ग अवलंबिला खरा. पण आता कपाळावर गुन्हेगारीचा शिक्का लागल्याने पोलीस खात्यासह कोणत्याही सरकारी नोकरीची भविष्यातील संधी ते दोघे गमावून बसले आहेत. राजपुत्राचे वलय असलेला रामसुद्धा वनवासात होता. पण त्या काळात परिस्थितीशी संघर्ष करून पुढे कसे जायचे, याचा आदर्श आपल्याला मिळाला. परिस्थितीच्या जोखडाखाली प्रामाणिकपणा सोडला, तर स्पर्धापरीक्षेच्या अभ्यासावर कसे पाणी फिरते, हे दिसून आले. म्हणून ‘ऑनेस्टी इज बेस्ट पॉलिसी’ हा नियम कलियुगात लागू आहे.

-महेश पांचाळ

(PRAHAAR)