मुंबई : ‘सीएसएमटी येथील पूलाचा आॅडिट अहवाल येत्या २४ तासात सादर करण्याचे’ आदेश मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त अजॉय मेहता यांनी दक्षता विभागाला दिले आहेत. पूल दुर्घटनेनंतर आयुक्तांनी शुक्रवारी सकाळी तातडीची बैठक बोलावली. ‘पूलाची डागडुजी करण्यासंदर्भात सुचवलेली दुरुस्ती लागू केली होती का?’ याबाबत तात्काळ चौकशी करण्यात यावी’ असे आदेश आयुक्तांनी दक्षता विभागाला दिले आहेत.
गुरुवारी सायंकाळी ऐन गर्दीच्या वेळेस सीएसएमटी येथील पूलाचा काही भाग कोसळल्याने भीषण दुर्घटना घडली. या घटनेत तीन महिलांसह ६ जणांचा मृत्यू झाला आहे, तर ३४ जण जखमी झाले आहेत. शुक्रवारी पहाटे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सेंट जॉर्ज हॉस्पिटलमध्ये जाऊन पूल दुर्घटनेतील जखमींची विचारपूस केली. यानंतर त्यांनी स्ट्रक्चरल ऑडिट करूनही अशा प्रकारच्या दुर्घटना होत असल्याबद्दल चिंता व्यक्त केली. ‘या दुर्घटनेची जबाबदारी निश्चित करून संध्याकाळपर्यंत कारवाई करावी’ अशा सूचना पालिका आयुक्तांना दिल्या असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले
हा पूल महापालिकेच्या अखत्यारित आहे. एलफिन्स्टन पुल दुर्घटनेनंतर सगळ्या पुलांचे ऑडिट करण्यात आले असल्याचे पालिकेचे म्हणणे आहे. असे असताना सीएसएमटी येथील पूलाच्या दुरुस्तीबाबत योग्य ती पावले उचलण्यात आली की नाही? असा प्रश्न निर्माण होत आहे.
(PRAHAAR)