दापोली : कोकणात सध्या एका ‘प्रितम’ या मराठी चित्रपटाचे शुटींग चालु आहे. या मराठी चित्रपटाचे शुटींग मंगळवारी दापोली येथील दापोली अर्बन बँक येथे करण्यात आले. बँकेचे अध्यक्ष जयवंत जालगावकर, दापोली तालुक्यातील दाभोळ येथील सामाजिक कार्यकर्त्या मृदुला निमकर यांच्या सहकार्यामुळे हे शुटींग दापोली अर्बन बँकेत करण्यात आले. त्यामुळे आता काही महिन्यांनी रिलीज होणा-या या चित्रपटात दापोली अर्बन बँक ही झळकणार आहे.
एका आगळया वेगळया लव्ह स्टोरीवर आधारीत हा चित्रपट असणार आहे. या चित्रपटाचे मुख्य प्रवर्तक सीजो सिंग यांनी ही माहिती दिली. या चित्रपटात कथानकानुसार एक सीन बँकेत शुट करावा लागणार होता. बँकेचे अध्यक्ष जयवंत जालगावकर यांना यासंबंधी माहिती दिल्यावर त्यांनी तात्काळ यासाठी सहकार्य करण्याची भुमिका घेतली व हे शुटींग बँकेत करण्यात आले. यासाठी बँक प्रशासनाचे मिळालेले सहकार्य उत्तम होते अशी प्रतिक्रिया या चित्रपटाच्या प्रसिध्द कॉश्चुम डिझायनर झी गौरव पुरस्काराच्या मानकरी नीता डोंगरे यांनी ‘दैनिक प्रहार’ जवळ बोलताना दिली.
या चित्रपटात मराठी चित्रपट सृष्टितील उपेंद्र लिमये, अजित देवळे, आभा वेलणकर आदि दिग्गज कलाकरांच्या भुमिका असणार आहेत. स्टार प्रवाह वाहिनीवरील लेक माझी लाडकी या सिरीयलमधील अभिनेत्री नक्षत्रा मेढेकर या चित्रपटात नायिकेची भुमिका साकारत आहेत. तर प्रणव रावराणे हा या चित्रपटाचा मुख्य नायक आहे. या चित्रपटाचे शुटींग कोकणात कुडाळ, चिपळूण, आंबडस येथे करण्यात आले आहे. येत्या काही दिवसात हे शुटींग पूर्ण झाले की अंदाजे मार्चपर्यंत चित्रपट रिलीज होणार असल्याची माहिती सीजो सिंग यांनी दिली.
या शुटींगमुळे मंगळवारी दापोलीकरांना दिवसभर या शुटींगची उत्सुकता लागुन राहिली होती. शुटींग पाहण्याच्या उत्सुकतेने अनेकांनी बँकेसमोर गर्दी केली होती.
डेली सोपमध्ये काम करणारी नक्षत्रा मेढेकर हीने या शुटींगदरम्यान सांगितले की, मी खरे तर डेली सोपमध्येच काम करते मात्र सध्या आपण एक महिनाभार रजेवर आहोत त्यामुळे आपण या चित्रपटाची ऑफर स्वीकारली असल्याचे सांगितले. त्यामुळे माझ्यासाठी हा पहिलाच चित्रपट असुन मराठी चित्रपटात आपण करू असा कधी विचार आपण केला नव्हता अशी माहिती देत ‘दैनिक प्रहार’ जवळ संवाद साधला. या चित्रपटाच्या शुटींगवळी बँकेचे संचालक श्री. कळसकर, रमा बेलोसे, श्यामल जालगावकर, माजी पं. स. सदस्य निलेश जालगावकर, बँकेचे मुख्य व्यवस्थापक रमेश कडु, प्रमोद शेठ, व्यवस्थापक श्री. सावंत, मनोज वणकर आदी उपस्थित होते. बँकेचे कामकाज संभाळुन या शुटींगसाठी बँक संचालक व प्रशासन कर्मचा-यांनी सहकार्य केल्याने नीता डोंगरे यांनी समाधान व्यक्त केले.
(PRAHAAR)