वयाच्या अवघ्या १९ व्या वर्षी जपान येथे “सिनिअर मिस्टर एशिया” पटकावलेला भारतातील सर्वात तरुण बॉडीबिल्डर सिद्धांतचे मराठी चित्रपटात प्रथम पदार्पण
दाक्षिणात्य “आय” मुव्ही फेम कामराज चे मराठीत पदार्पण
कैलाश खेर यांचे मराठीत इन्स्पिरेशनल साँग
लव्ह साँग, थिरकवणारे आयटम साँग, काळजाचा ठोका घेणारे थिम साँग, इन्स्पिरेशन साँग, तरुणाईचा जोश वाढविणारे टायटल साँग अशी वेगवेगळ्या धाटणीची ५ गाणी
प्रहार वेब टीम
मुंबई : तुफान, धडाकेबाज आणि जोशपूर्ण असा “शिवा – एक युवा योद्धा” सिनेमा येत्या १५ फेब्रुवारी रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. दमदार आणि कडक अंदाजात भेटीला येणारा शिवा म्हणजेच बॉडीबिल्डर सिद्धांत मोरे याची प्रमुख भूमिका आहे. खेळ आणि आरोग्य या दोन महत्त्वाच्या गोष्टींवर आतापर्यंत बरेच लिखाण केलेले शिव छत्रपती पुरस्कार विजेते लेखक संजय मोरे यांनी अडीच वर्ष परिश्रम घेत या सिनेमाचे लेखन केले आहे.
डॉ. संजय मोरे मनोगत व्यक्त करताना म्हणाले, शिवा सिनेमाची निर्मिती एका सामाजिक जबाबदारीने केली आहे. आपल्या सभोवताली असलेल्या परिस्थितीचं चित्रण मनोरंजनाच्या माध्यमातून केलं आहे. सिनेमात शिवा ही प्रमुख भूमिका निभावणारा सिद्धांत मोरे म्हणतो, बॉडीबिल्डिंग क्षेत्रातील माझे आदर्श आर्नोल्ड, रॉक यांना पाहिलं तर बॉडीबिल्डिंग प्रमाणे सिनेक्षेत्रातही त्यांची यशस्वी कारकीर्द ठरली आहे. त्यांना मिळालेलं चाहत्यांचं प्रेम माझ्यासारख्या नवोदित कलाकारांसाठी प्रेरणादायी आहे. शिवा या सिनेमाला देखील असाच उदंड प्रतिसाद मिळेल ही आशा. सिनेमात येण्यापूर्वी ‘सिनियर मिस्टर एशिया’ या जपानमध्ये झालेल्या जागतिक शरीरसौष्ठव स्पर्धेत ‘क्लासिक बॉडीबिल्डिंग’ गटात सगळ्यात तरुण भारतीय असलेल्या सिद्धांतने वयाच्या अवघ्या १९ व्या वर्षी ‘सिनिअर मिस्टर एशिया’ हा बहुमान पटकावला होता. ६ फूट १ इंच उंची असलेला, बलदंड भुजा, भरदार छाती, रुंद पाठ, पट पडलेल्या मांड्या, धाटधार पोट-या असा अस्सल खेळाडू सिद्धांतचे या सिनेमाच्या माध्यमातून एक चॉकलेट बॉय म्हणून प्रथम पदार्पण होत आहे. त्याने या सिनेमासाठी तब्बल ४ वर्षे मेहनत घेतली आहे. यातील सर्व जीवघेणे स्टंट्स स्वतः दिले आहेत. या सिनेमात एका अपंग व्यक्तीने निभावलेली मैत्रीची व्याख्या सांगणारी महत्वाची भूमिका पाहता ‘शिवा’चे वेगळेपण नक्की जाणवेल.
‘शिवा’ सिनेमाचा भन्नाट ट्रेलर आणि नादावणारी गाणी सिनेरसिकांना नक्कीच आवडतील अशी आहेत. या सिनेमात निव्वळ मनोरंजन नाही तर सामाजिक परिस्थितीचं भान ही राखलं गेलं आहे. दुष्काळात शेतक-यांचे होणारे हाल आणि त्यावर शासनाकडून मदतीच्या नावाखाली केली जाणारी थट्टा सिनेमात नेमकेपणाने मांडली आहे. व्यसनांच्या आहारी जाणा-या तरुणाईला कोणताही उपदेशाचा डोस न देता तरुणांची नेमकी नस ओळखून सिनेमात या समस्येवर बोट ठेवलं गेलं आहे. अॅक्शन, रोमान्स, थिरकायला लावणारी गाणी असं एंटरटेनमेंटचं कम्प्लिट पॅकेज असलेला शिवा सिनेमा मनोरंजनाची उत्तम पर्वणी ठरणार आहे. एखाद्या हिंदी सिनेमाला लाजवेल असे सादरीकरण असलेला हा सिनेमा प्रेक्षकांना अधिक भावेल असा आहे.
अभिनेता सिद्धांत मोरे, तन्वी हेगडे, योगिता चव्हाण, मिलिंद गुणाजी, योगेश मेहेर, सुनील गोडबोले, प्रकाश धोत्रे, शोभना दांडगे, जीत मोरे, बाबासाहेब सौदागर आणि दक्षिणेतील सुपरस्टार (“आय” सिनेमा फेम) कामराज ही कलाकार मंडळी सिनेमात दिसणार आहे. या सिनेमातील गाणी सहज प्रेक्षकांच्या मनाला भिडणारी आहेत. वेगवेगळ्या धाटणीची ही पाचही गाणी मनाचा ठाव घेणारी आहे. या सिनेमाच्या निमित्ताने सुप्रसिद्ध गायक कैलाश खेर यांचं ‘प्रलय भयंकर’ हे मराठीत गायलेलं इन्स्पिरेशनल साँग ऐकण्याचा योग येणार आहे. गायक रुपाली मोघे आणि सागर फडके यांच्या आवाजातील तुफान गाजेल असं ‘एन्जॉय करू’ हे झिंग चढवणारं आयटम साँग थिरकायला लावणारं आहे.
या सिनेमाची कथा शिवा (सिद्धांत मोरे) आणि त्याच्या एकंदर प्रवासाची आहे. शिवाच्या वडिलांनी दिलेली शिकवण आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे संस्कार आचरणात आणत त्याने उत्तम माणूस आणि योद्धा बनून केलेली वाटचाल सिनेमात दाखविली आहे. नवीन वर्षातील ‘शिवा’ हा धमाकेदार सिनेमा येत्या १५ फेब्रुवारी २०१९ रोजी सिनेमागृहात प्रेक्षकांची गर्दी करेल अशी सिनेमाच्या टीमने आशा व्यक्त केली आहे.
(PRAHAAR)