X Close
X
9819022904

कोस्टल रोड टोलमुक्त : उद्धव ठाकरे


Mumbai:

प्रहार वेब टीम

मुंबई : कोस्टल रोड टोल फ्री असेल, अशी घोषणा शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. त्यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या कोस्टल रोड प्रकल्पाचे भूमिपूजन रविवारी सायंकाळी पार पडले. त्यावेळी ते बोलत होते. या प्रकल्पामुळे नरिमन पॉर्इंट ते कांदिवलीपर्यंतचा ३५.६ कि.मी. लांबीचा प्रवास ७० टक्के कमी वेळेत होणार आहे.

या प्रकल्पाचे बांधकाम मुंबई महानगरपालिका आणि राज्य सरकारकडून होणार आहे. त्यामुळे भूमिपूजनाला मुख्यमंत्र्यांना बोलवणे अपेक्षित होते. पण शिवसेनेने मुख्यमंत्र्यांना निमंत्रण न दिल्याने भाजपाने या कार्यक्रमाला अनुपस्थित राहत बहिष्कार टाकला. स्थानिक आमदार मंगल प्रभात लोढा निमंत्रण असूनही अनुपस्थित राहिले. कार्यक्रमावेळी झालेल्या भाषणादरम्यान मुंबई महानगरपालिकेचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी ‘अनेकांनी या प्रकल्पाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न केला’ असे म्हणत भाजपाला टोला हाणला. त्यामुळे या भूमिपूजनाच्यावेळी सेना-भाजपामधील श्रेयवादाची लढाई प्रकर्षाने दिसून आली.

शिवसेनेद्वारे आयोजित भूमिपूजनाचा कार्यक्रम अमरसन्स उद्यान कंबाला हिल येथे झाली. यावेळी रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे, महापौर विश्वनाथ महाडेश्वर, आयुक्त अजोय मेहता, उद्योगमंत्री सुभाष देसाई, खासदार अरविंद सावंत उपस्थित होते. भाजपने या प्रकल्पाचे श्रेय घेणारी पोस्टर्स मुंबईभर लावली आहेत. एक पोस्टर तर सेना भवनसमोर लावण्यात आले आहे. त्यात या प्रकल्पाचे श्रेय मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांना देण्यात आले आहे. कोस्टल रोडच्या भूमिपूजनाला मुख्यमंत्र्यांना निमंत्रित करण्यात आले नसल्याने पंतप्रधानांच्या हस्ते होणाऱ्या मेट्रोच्या भूमिपूजनाला सेनेला डावलण्यात आले आहे.