X Close
X
9819022904

‘बूमरँग’ होताच शरीफ यांचा ‘यू टर्न’


nawaz-sharif

मुंबईवरील हल्ल्यामागे पाकिस्तानी दहशतवाद्यांचा हात असल्याची कबुली पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांनी दिली होती. पण आता भारतीय माध्यमांनी आपल्या वक्तव्याची चुकीची व्याख्या केल्याचे सांगून नवाज शरीफ यांनी ‘यू टर्न’ घेतला आहे.

शरीफ यांनी मुंबईवरील हल्ल्याबाबत केलेल्या वक्तव्यानंतर पाकिस्तानात प्रचंड खळबळ उडाली. ही कबुली अंगलट आल्यानंतर शरीफ यांच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान मुस्लिम लीग पक्षाने त्यांची बाजू घेत सारवासारव केली असली तरी शरीफ यांच्या या वक्तव्यावर पाकिस्तानी सैन्य भडकले आहे. त्यामुळे पाकिस्तानचे पंतप्रधान शाहिद खाकान अब्बासी यांच्या अध्यक्षतेखाली पाकिस्तान राष्ट्रीय सुरक्षा परिषदेची आपत्कालीन बैठक पार पडली असून या बैठकीत अडीच तास खलबते झाली आहेत. आगामी काळात शरीफ यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळेच शरीफ यांना आपल्या वक्तव्यापासून फारकत घ्यावी लागल्याचे दिसते. दहशतवाद्यांना आसरा देत नसल्याचा दावा पाकिस्तानकडून नेहमीच आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर केला जातो. मात्र शरीफ यांच्या कबुलीने पाकिस्तानचा पदार्फाश झाला आहे. पाकिस्तानमध्ये दहशतवादी संघटना सक्रिय असल्याचे शरीफ यांनी मान्य केले. मात्र आपल्या दाव्यांपासून शरीफ यांना फारकत घेतल्याने आंतरराष्ट्रीय पातळीवर त्यांच्यावर दबाव आल्याचे स्पष्ट होते. मुंबई हल्ल्यामागे पाकिस्तानचा हात असल्याची कबुली देण्यामागे शरीफ यांची राजकीय अपरिहार्यता होती. शरीफ यांनी मुंबई हल्ल्याचा मुद्दा उपस्थित करण्यामागचे एक संभाव्य कारण असे असू शकते की, पाकिस्तानच्या सध्याच्या अस्थिर राजकारणात त्यांना भारताच्या मित्रदेशांकडून छुप्या राजकीय पाठबळाची आवश्यकता असावी. पाकिस्तानात लवकरच सार्वत्रिक निवडणुका होत असून सगळीकडून कोंडी झालेल्या नवाझ शरीफ यांना सुटकेची संधी हवी होती. त्यांना त्यांच्या पक्षातून जाहीर आव्हान मिळालेले नाही, पण माजी क्रिकेटपटू इम्रान खान यांच्या ‘तेहरिक-ए-इन्साफ’ या पक्षाने शरीफ यांच्याविरोधात जोरदार कंबर कसली आहे. इम्रान खान यांचा पक्ष कट्टरवादी राजकारणाच्या जवळ जाणारा असून या पक्षाला मिळत असलेला वाढता पाठिंबा भारतासाठी धोका आहे. पाकिस्तानातील घटनात्मक सरकारच्या मानगुटीवर लष्कर, आयएसआय, मुस्लिम कट्टरपंथी आणि दहशतवादी संघटनांच्या तलवारी कायम टांगलेल्या असतात. आपल्या वक्तव्यातून शरीफ यांनी हेच मान्य केले. पाकिस्तानचे जे गुपित जगाला माहिती होते, ते शरीफ यांनी जाहीररीत्या कबूल केले. भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आणि विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत-पाकिस्तान या दोन्ही देशांत शांततापूर्ण व सौहार्दाचे संबंध निर्माण होण्यासाठी केलेल्या प्रयत्नांना शरीफ यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. शरीफ यांची ही एक बाजू झाली, पण शरीफ यांची दुसरी बाजू जास्तच काळीकुट्ट आहे. कारण २६/११ च्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याला आता जवळपास १० वर्षे पूर्ण झाली. त्यानंतर शरीफ यांनी २०१३ ते २०१७ या काळात पाकिस्तानचे पंतप्रधानपदही उपभोगले, त्यावेळी शरीफना आपल्या कृष्णकृत्यांची कबुली द्यायची उपरती का झाली नाही? आपल्या कार्यकाळात शरीफ यांनी या दहशतवादी हल्ल्यातील सहभागी दोषींविरोधातील खटल्याची सुनावणी का पूर्ण केली नाही? तेव्हा त्यांना या लोकांविरोधात कारवाई करण्यापासून कोणी अडवले होते का? याचे उत्तरही शरीफ यांनी याच मुलाखतीत दिले, हेही बरे झाले. जिथे दोन वा तीन समांतर सरकारे चालत असतील त्या ठिकाणी देशाचा कारभार नीटपणे चालवू शकत नाहीत, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. म्हणजेच शरीफ पंतप्रधानपदी असताना त्या देशात घटनात्मक सरकारला काडीचीही किंमत नव्हती आणि अन्य समांतर सरकारे अस्तित्वात होती. शरीफ यांनी मुलाखतीत त्या समांतर सरकारांची नावे घेतली नसली तरी ती कोणती हे जगजाहीर आहे. पाकिस्तानातील घटनात्मक सरकारच्या मानगुटीवर लष्कर, आयएसआय, मुस्लिम कट्टरपंथी आणि दहशतवादी संघटनांच्या टांगत्या तलवारी कायम असतात. आपल्या वक्तव्यातून शरीफ यांनी हेच मान्य केले होते. शरीफ यांना आपल्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळात मुंबईवरील हल्ल्याबाबत चकार शब्दही काढण्याची हिम्मत या समांतर सरकारांच्या भीतीमुळेच झाली नसावी आणि आताही पुन्हा आपल्याच दाव्यापासून फारकत घेण्याची वेळ त्यांना याच समांतर सरकारांमुळे आली असावी. पाकिस्तानच्या कोणत्याही अंतर्गत बाबीत भारताचा कोणताही हस्तक्षेप होत नसताना केवळ संशयाच्या बळावर पाकिस्तानने कुलभूषण यांना भारतीय हेर ठरवून फाशीची शिक्षाही ठोठावली. पण भारतावर हल्ला करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणा-या हाफीजला अभय दिले जात आहे, हा पाकिस्तानचा दुटप्पीपणा आहे. आता शरीफ यांच्या कबुलीनंतर पाकिस्तानला जागतिक व्यासपीठावर उघडे पाडण्यासाठी भारताला आपल्या मुत्सद्दीपणाची कसोटी दाखवावी लागणार आहे. शरीफ सध्या पंतप्रधानपदावर नसल्याने, ते अशी विधाने करीत आहेत, अशी भूमिका पाकिस्तानी सत्ताधा-यांकडून घेतली जात आहे, पण पाकिस्तानातील सध्याचे सरकार हे शरीफ यांच्याच पक्षाचे आहे, हेही विसरून चालणार नाही. म्हणूनच शरीफ स्वत: ‘आपण असे बोललोच नव्हतो,’ असा पवित्रा घेताना दिसतात. पण त्यामुळे परिस्थितीत कोणताही फरक पडणार नाही. कारण पाकिस्तानच्या नापाक कारवाया अनेकवेळा समोर आल्या आहेत. काही ताज्या उदाहरणांवरूनही पाकिस्तानचा भारतद्वेष उघड होऊ शकतो. भारतात पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी हल्ले होतात या भारतीय भूमिकेला शरीफ यांच्या मुलाखतीने आंतरराष्ट्रीय पातळीवर बळ मिळाले आहे. पाकिस्तानची उरलीसुरली प्रतिमाही धुळीस मिळाली आहे. आम्हीच पाकिस्तानी दहशतवाद्यांना सीमेपलीकडे पाठवले, जाऊ दिले व मुंबईवर हल्ला घडवून आणला, हे त्यांचे शब्द पाकिस्तानच्या नापाक इराद्यावर प्रकाशझोत टाकणारे आहेत. लष्कर-ए-तोयबा, जैश-ए-महंमद या दहशतवादी संघटना भारतात दहशतवादी कारवाया करण्यासाठीच जन्माला आल्या आहेत. त्यामुळे या संघटनांच्या हाफीज आणि अझर या नेत्यांना जेरबंद करणे हेच उद्दिष्ट आता भारताला समोर ठेवावे लागेल. हाफीजला भारताच्या ताब्यात देण्याची मागणी भारताने आता नव्याने अधिक आक्रमकपणे करण्याची गरज आहे. तसेच मुंबई हल्ल्याबाबतचा पाकिस्तानातील खटलाही गांभीर्याने आणि वेगाने चालावा म्हणून पाकिस्तानवर दबाव आणण्याची गरज आहे.

(PRAHAAR)