X Close
X
9819022904

हिरे आयातीत ३ हजार कोटींचा घोटाळा


diamonds

डीआरआयकडून पर्दाफाश, नरेश मेहता मुख्य सूत्रधार, कस्टम अधिका-यासह चौघाना अटक

मुंबई – हिरे आयात करताना त्या हि-यांचे मूल्यांकन कमी करून, कर चुकवेगिरी करणा-या एका रॅकेटचा डायरेक्टरेट ऑफ रेव्हेन्यू इंटेलिजेन्स (डीआरआय)ने पर्दाफाश केला असून, या प्रकरणी हिरे मूल्यांकनकर्ता नरेश मेहताला अटक करण्यात आलेली आहे. हि-यांचे मूल्यांकन करून त्या आधारावर मोठमोठय़ा बँकांना कर्ज देण्यास भाग पाडून, राष्ट्रीयीकृत बँकांची हजारो कोटी रुपयांची फसवणूक झाल्याची शक्यता असून त्यादृष्टीने आता तपास सुरू असल्याचे दिसून येते. प्रथमदर्शनी हा ३ हजार कोटींचा घोटाळा असून त्याची व्याप्ती वाढण्याची शक्यता आहे.

भारतात बाहेरच्या देशांमधून कच्चे हिरे आयात केले जातात. या हि-यांचे मूल्यांकन वाढवून काळा पैसा पांढरा करण्याची करामत केली जाते. नीरव मोदीने हीच शक्कल लढवून हि-यांचे मूल्यांकन वाढवून घेतले आणि पंजाब नॅशनल बँकेला गंडा घातला. हिरे आयात करताना, ते कच्चे पैलू न पाडलेले अशा स्वरूपात असतात. पैलू पाडलेल्या हि-यांची किंमत आणि कच्चे हिरे हे कार्बन स्वरूपातच असतात.

त्यामुळे त्याला आकारण्यात येणारे आयात शुल्क हे कमी असते. अशाप्रकारे नीरव मोदीने १ कोटी रुपये हि-यांच्या किमतीत १६० कोटी किमतीचे हिरे आयात केले. काळा पैसा पांढरा करण्यासाठी आणि आयात शुल्क वाचवण्यासाठी हि-यांच्या किमती आणि मूल्यांकन सोयीनुसार केले जाते. अशाप्रकारे बँकांकडून जादा कर्ज घेण्यासाठी मूल्यांकन वाढवले जाते, तर आयातशुल्क वाचवण्यासाठी त्याचे मूल्यांकन कमी केले जाते. हे उपद्व्याप करणारे मूल्यांकनकर्ते ताब्यात घेतले आहेत. कच्चे हिरे आयात करताना, त्यावर फक्त ०.२५ टक्के  शुल्क आकारले जाते. कच्चे हिरे सांगून अनेकवेळा पैलू पाडलेले हिरे विकले जातात आणि शुल्क चुकवले जाते.

अशाप्रकारे ९५ टक्के गैरव्यवहार केला जात असल्याच्या संशयावरून डीआरआयने कारवाई केली. यात नरेश मेहता या पेडर रोडवरील प्रभू कुंज येथे राहणा-या मूल्यांकनकाराला पकडण्यात आले आहे. याशिवाय महालक्ष्मी येथील प्रदीपकुमार जव्हेरी आणि परेश शहा यांचाही या गैरव्यवहारात समावेश असल्याचे उघड झाले आहे. या घोटाळय़ात विशाल कक्कड या कस्टम अधिका-याचाही समावेश आहे.

(PRAHAAR)