X Close
X
9819022904

सिंधुदुर्गातील विमान लँडिंगची शिवसेनेची नौटंकी; ७५ टक्के परवानग्या नसताना उतरविले विमान, नारायण राणे यांचा हल्लाबोल


Mumbai:

प्रहार वेब टीम

कुडाळ : सिंधुदुर्गातील चिपी विमानतळावर विमानाचे लँडिंग केल्याचा डांगोरा पिटून सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर आणि शिवसेनेचे पदाधिकारी स्वत:ची पाट थोपटून घेत आहेत. खरे तर त्यांना असे श्रेय घेण्याचा कोणताही अधिकार नाही. कारण याच लोकांनी चिपी विमानतळाच्या जमीन संपादनाला विरोध केला होता. आता मात्र अनधिकृत लँडिंग करून श्रेय लाटण्याची नौटंकी शिवसेना करीत आहे, असा घणाघाती टोला महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक अध्यक्ष, माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी लगावला आहे. केसरकर यांनी केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री सुरेश प्रभू यांच्याकडे दोन वेळा अश्रू ढाळल्यानंतर लँडिंगची मुभा मिळाल्याचा गौप्यस्फोट राणे यांनी केला.

सिंधुदुर्गातील चिपी विमानतळावर खासगी विमानाचे लँडिंग झाले. त्याचे श्रेय लाटण्याच्या शिवसेनेच्या नौटंकीचा नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन भंडाफोड केला. ते म्हणाले की, विमान लँडिंगचा आजचा कार्यक्रम सरकारी नव्हता. त्याची कल्पना राज्य सरकारला, एमआयडीसीला किंवा विमानतळ बांधणा-या वीरेंद्र म्हैसकर यांच्या आयआरबी कंपनीला देण्यात आली नव्हती. मुंबईतील उद्योजक वदवा यांचे खासगी विमान १० लाख रुपयांच्या भाडय़ाने घेऊन कोणतीही पूर्वतयारी न करता ही नौटंकी करण्यात आली आहे, असेही राणे म्हणाले.

चिपी विमानतळाच्या बांधकामाचा इतिहास सांगताना नारायण राणे म्हणाले की, सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासासाठी मी मंत्री असताना हा जिल्हा पर्यटन जिल्हा म्हणून घोषित केला. त्यानंतर येथे पर्यटन वाढावे यासाठी विमानतळ सुरू होण्यासाठी मी प्रयत्न केले. उद्योग खाते माझ्याकडेच असल्याने एमआयडीसीमार्फत हे काम वीरेंद्र म्हैसकर यांच्या आयआरबी कंपनीकडे सोपविण्यात आले. २०१४ पर्यंत विमानतळाच्या बांधकामाच्या रनवेचे काम पूर्णत्वास गेले होते. या विमानतळाची धावपट्टी ही गोवा विमानतळापेक्षा जास्त म्हणजे ३ हजार ४०० मीटर लांबीची होती. मात्र या सरकारने ही धावपट्टी कमी करून २ हजार ५०० मीटर एवढीच केली. हे विमानतळ रद्द करण्याच्या तयारीत हे सरकार होते. मात्र हा त्यांचा डाव मी हाणून पाडला, असे राणे म्हणाले.

सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विकास व्हावा म्हणून चिपी विमानतळ, सी वर्ल्ड आणि रेडी बंदर हे महत्त्वाकांक्षी प्रकल्प मी सुरू करून घेतले. शिवसेनेने ते बंद पाडण्याचा प्रयत्न केला. केसरकर यांनी जिल्ह्यात नवीन काही आणले नाही, उलट रेडी बंदरला स्थगिती देऊन ते बंद पाडले होते. मात्र संबंधित ठेकेदारांनी स्थगिती उठवून बंदराचे काम पुन्हा सुरू केले. अशा प्रकारे विकासकामामध्ये खो घालण्याचे कामच केसरकर करीत आहेत, असा आरोपही राणे यांनी केला.

विमानतळावरून विमानोड्डाण करण्यासाठी आवश्यक असणा-या ६२ परवानग्यांपैकी फक्त २५ टक्केच म्हणजेच २० परवानग्या या कंपनीला मिळालेल्या आहेत. बाकीच्या परवानग्या मिळालेल्या नाहीत. तसेच ‘डीजीसीए’ची परवानगीही मिळालेली नाही. हे एअरपोर्ट डोमेस्टिक होण्यासाठी अर्जसुद्धा केलेला नाही. असे असताना खासगी विमान उतरवण्याचा अट्टहास का, असा सवाल नारायण राणे यांनी केला.

राज्यसभेच्या गेल्या अधिवेशनामध्ये हवाई वाहतूक मंत्री सुरेश प्रभू यांना विमानतळाचे बांधकाम व विमानोड्डाणाबाबत विचारणा केली होती. त्यावेळी त्यांनी १२ सप्टेंबर रोजी विमानाची चाचणी होईल असे सांगितले होते. मात्र ब-याचशा परवानग्या मिळाल्या नसल्यामुळे ही चाचणी होऊ शकली नाही. बुधवारी झालेल्या ट्रायल लँडिंगला हवाई वाहतूक मंत्री सुरेश प्रभू हेसुद्धा उपस्थित नव्हते. विमानतळाच्या ठिकाणी आवश्यक असलेल्या सुविधाही अद्याप पूर्ण झालेल्या नाहीत. त्या ठिकाणी पाणी, वीज तसेच जोडरस्ते, बीएसएनएलची यंत्रणासुद्धा या ठिकाणी नाही, असेही राणे म्हणाले.

यावेळी आमदार नितेश राणे, महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत, महिला जिल्हाध्यक्ष प्रणिता पाताडे, सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष विकास कुडाळकर, अशोक सावंत, जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजित देसाई, कुडाळ तालुकाध्यक्ष दीपक नारकर, मालवण तालुकाध्यक्ष मंदार केणी, सावंतवाडी तालुकाध्यक्ष संजू परब, वेंगुर्ले तालुकाध्यक्ष मनीष दळवी, कणकवली तालुकाध्यक्ष सुरेश सावंत, माजी जिल्हा परिषद सभापती सौ. अस्मिता बांदेकर, कुडाळ नगराध्यक्ष विनायक राणे, नगरसेवक सुनील बांदेकर, राकेश कांदे, महिला शहराध्यक्ष रेखा काणेकर, कणकवली पंचायत समिती सदस्य मिलिंद मेस्त्री, आरोग्य सभापती साक्षी सावंत, नगरसेविका अश्विनी गावडे, दादा साईल, रुपेश कानडे आदी उपस्थित होते.