X Close
X
9819022904

सारे प्रवासी घडीचे..!


dapoli-accident

या एका अपघाताने अनेकांच्या स्वप्नांचा चुराडा झाला आहे. इतकी भयानक आणि दुर्दैवी घटना कोकण कृषी विद्यापीठाची या अपघाताच्या निमित्ताने घडली आहे.

कोकण कृषी विद्यापीठाच्या अधिकारी, कर्मचा-यांची प्रतिवर्षी वर्षासहल जात असे. याही वर्षी गेल्या आठवडय़ात अधिकारी आणि कर्मचा-यांची पर्यटन सहल महाबळेश्वरला जाण्यासाठी निघाली होती. ३१ प्रवासी या वर्षा पर्यटन सहलीसाठी निघाले होते. सकाळी दापोलीच्या कृषी विद्यापीठातून वर्षासहलीसाठी निघालेल्या त्या तीसही जणांना आंबेनळी येथील बस अपघातात मृत्यूने गाठले. वर्षासहलीसाठी ज्या आनंदात हे सारे प्रवासी निघाले होते, त्यांचा हा प्रवास काही तासांसाठीच ठरला. विधीलिखित , नियती हे शब्द अंधश्रद्धेची जोडले जाऊ शकतात; परंतु जेव्हा अशी अनाकलनीय घटना समोर येते तेव्हा मात्र नियती या शब्दावर विश्वास बसल्यावाचून राहत नाही. रत्नागिरी-सिंधुदुर्ग-रायगड या भागातील कोकण कृषी विद्यापीठामध्ये कार्यरत असणारे अधिकारी, कर्मचारी यांची ही वार्षिक सहल होती. सहलीसाठी गेलेले कर्मचारी आणि बसमध्ये जागा असूनही त्या त्या वेळच्या तात्कालीन कारणामुळे न गेलेले आणि या अपघातातून बचावलेले कर्मचारी या सर्वामध्ये ‘जर – तर’ या शब्दांनाही किती महत्त्व असते. हेही यानिमित्ताने अधोरेखित झाले आहे.

कोकण कृषी विद्यापीठाच्या नव्याने सेवेत दाखल झालेले आणि गेली काही वर्षे विद्यापीठाच्या सेवेत कार्यरत असलेले अशा या दोन पिढय़ांमधील ३० कर्मचारी मृत्युमुखी पडले. एखाद्या संस्थेमधील एखाद्या अपघातामध्ये एवढय़ा मोठय़ा संख्येने बळी पडण्याची कोकणातील बहुधा ही पहिली घटना असावी. या घटनेतील दु:खाचा परिघ हा दापोली कोकण कृषी विद्यापीठाच्या मर्यादेमध्ये राहत नाही तर अखंड कोकण प्रांतावर या अपघाताने दु:खाचा डोंगर कोसळला आहे. या अपघातामध्ये मृत्यू पावलेल्या तीस जणांच्या कुटुंबीयांसाठी भविष्यातील जगणे जसे जिकिरीचे झाले आहे, त्याचप्रमाणे विद्यापीठाच्या संशोधन आणि विकास यावरही या सर्वांच्या जाण्याने मोठा परिणाम झाला आहे.

अपघात कसा झाला? त्याची कारणे काय आहेत? घाटातील रस्त्यांची स्थिती, सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष आदी अनेक प्रश्नांची उत्तरे यथावकाश शोधली जातील. शासनाच्या लालफितीमध्ये या अपघाताची, त्याच्या कारणमीमांसाची आणखी एक फाईल लाल रिबीन लावून ठेवली जाईल. परंतु, या अपघातामध्ये तीस कुटुंब, त्यांचे नातेवाईक आणि कोकणचे कृषी विद्यापीठ या सर्वांवर दुरगामी परिणाम मात्र निश्चितच झाले आहेत. कोकण कृषी विद्यापीठात दोन हजारांवर कर्मचारी आणि अधिकारी कार्यरत आहेत. महाराष्ट्र भरातील अनेक भागातील कर्मचारी, अधिकारी विद्यापीठाच्या सेवेत आहेत.

दर वर्षी जाणा-या सहलीच्या माध्यमातून जसा त्या कर्मचा-यांना, अधिका-यांना आनंद मिळतो, त्याचप्रमाणे या वर्षासहलीच्या माध्यमातून विद्यापीठात नवीन संशोधनासाठी नवी ऊर्जा घेऊन हे कर्मचारी, अधिकारी येत असतात. विविध विभागांमध्ये कार्यरत असणा-या अधिकारी, कर्मचा-यांचा सहभाग या वर्षासहलीमध्ये असतो. या वर्षाच्या वर्षासहलीने मात्र कोकण कृषी विद्यापीठामध्ये अपघाताच्या निमित्ताने निर्माण झालेले वातावरण आणि या अचानक घडलेल्या घटनेने कर्मचारी, अधिकारी सावरणेही अवघड झाले आहे. ज्यांच्या आयुष्यात ही दुर्दैवी घटना घडली आहे, त्या कुटुंबीयांसाठी सांत्वनाच्या चार शब्दांनी क्षणभरासाठी आधार वाटू शकेल; परंतु ज्यांनी मुलगा गमावला, ज्यांनी आपला पती गमावला, ज्यांनी वडील गमावले आणि अन्य नात्यांतीलही लोकांनी जे गमावले आहे त्याची भरपाईही अशक्यच असते.

या एका अपघाताने अनेकांच्या स्वप्नांचा चुराडा झाला आहे. इतकी भयानक आणि दुर्दैवी घटना कोकण कृषी विद्यापीठाची या अपघाताच्या निमित्ताने घडली आहे. शासकीय स्तरावर कुटुंबीयांना मदतही दिली जाईल. आर्थिक मदतीने भावनिक नात्यांची विण आणि जिवंत माणसांचा अनुभव देता येत नाही. परंतु, आजच्या व्यावहारिक जगात केवळ भावनिक होऊनही चालत नाही. या अपघातातील मृत्यू पावलेल्यांच्या कुटुंबीयांनाही पुढे चालायचे आहे आणि विद्यापीठालाही घडलेल्या घटनेने आणि आलेल्या प्रसंगातून सावरायचे आहे. कोकणच्या कृषी आणि शिक्षण क्षेत्राच्या विकासाची महत्त्वपूर्ण जबाबदारी ही विद्यापीठावर आहे. यामुळेच शेवटी सारे प्रवासी घडीचे एवढेच म्हणावेसे वाटते.

(PRAHAAR)