X Close
X
9819022904

सरकार देशाची अर्थव्यवस्था सुधारण्यास असमर्थ आहे. हेलिकॉप्टर खरेदी करार रद्द झालाच पाहिजे : संजय निरुपम


Mumbai:

प्रहार वेब टीम

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हेलिकॉप्टर खरेदीच्या करारामध्ये काल जे रुपयाचे अवमूल्यन केले, यावरुन त्यांचा त्यांच्या सरकारवर विश्वास राहिलेला नाही, त्यांचे सरकार ढासळलेली अर्थव्यवस्था सुधारु शकत नाहीत हेच स्पष्ट होते असे विधान मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी केले.

ते पुढे म्हणाले की, काल ११ सप्टेंबर २०१८ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शासनातर्फे २ हेलिकॉप्टर्स खरेदीसाठी एका अमेरिकन कंपनीशी करार केला आहे. या करारासाठी ग्लोबल टेंडर इश्यू करण्यात आला. निश्चितच ही टेंडरिंग डॉलर मध्ये झाली. पण ग्लोबल टेंडरिंग करताना त्या दिवशी रुपयाचा दर डॉलर मागे किती आहे? हे पाहूनच त्या वस्तूची किंमत ठरते. काल रुपयाचा भाव १ डॉलरमागे ७२.६ रुपये होता. पण या टेंडरमध्ये त्यांनी रुपयाचा भाव १ डॉलरमागे ८० रुपये असल्याचे नमूद केलेले आहे. जरी आज रुपयाची स्थिती १ डॉलरमागे ७२.६ इतकी खराब असली, भाजप सरकार हे कसे गृहीत धरु शकते की, हा करार जेव्हा अंतिम टप्प्यात असेल तेव्हा रुपया १ डॉलरमागे ८० रुपये असेल अशी मुख्यमंत्र्यांना खात्री आहे का? रुपयाच्या अवमूल्यनामागे भाजपचा हात आहे का? याचा अर्थ असा आहे की मुख्यमंत्र्यांचा आपल्या अर्थव्यवस्थेवर, रुपयावर विश्वासच नाही. म्हणून त्यांनी करारामध्ये रुपयाचे अवमूल्यन अगोदरच करुन टाकले. जर त्यांचाच विश्वास नसेल तर मग बाजारावर, अर्थव्यवस्थेवर त्याचा काय परिणाम होईल. हे सरकार आपल्या देशाची अर्थव्यवस्था सुधारु शकत नाही हेच यावरुन स्पष्ट होते.

१५० कोटी रुपयांचा हा व्यवहार आहे, रुपयाचा भाव १ डॉलरमागे ८० रुपये दाखवल्याने सरकारला १८ कोटी रुपयांचा तोटा होत आहे. सरकार १८ कोटी जास्त का देत आहे. १५० कोटी रुपयांचे हेलिकॉप्टर्स घेण्यासाठी महाराष्ट्राकडे पैसे आहेत का? महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्या करत आहेत. गाव-खेड्यांतील लोक उपाशी मारत आहेत. डिझेल पेट्रोल महाग होत आहे. आम्ही जेव्हा पेट्रोल डिझेलवरील वॅट १ रुपया कमी करायची मागणी करतो, तेव्हा तुम्ही सांगता की असे केले, तर ३ हजार कोटी रुपयांचा महसूल बुडेल. म्हणजे तुम्ही सरकारमध्ये बसून एक एक पैसा लोकांच्या खिशातून काढता आणि सरकारची तिजोरी भरता, मग स्वतःसाठी १८ कोटी रुपये तोटा सहन करुन एवढे महाग हेलिकॉप्टर विकत का विकत घेत आहेत? हा अट्टाहास का? या करारामध्ये १ डॉलरमागे रुपया किंमत ८० रुपये का टाकली आहे. यामध्ये कोणी दलाली केली आहे का? ही शासनाची चूक आहे. हा करार रद्द झालाच पाहिजे. या कराराच्या पैशांनी मुख्यमंत्र्यांनी जनतेसाठी इतर विधायक कामे करावीत. महाराष्ट्रातील जनतेला १५० कोटीची हेलिकॉप्टर्स नको आहेत. त्यांना इतर सोयीसुविधा हव्या आहेत. त्यांना स्वस्त पेट्रोल डिझेल हवे आहे. त्यांना महागाई नको आहे. त्यांच्यासाठी तुम्ही काम करा. स्वतःच्या सोयीसुविधेसाठी तुम्ही काम करु नका. हा करार रद्द झालाच पाहिजे अशी मागणी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी केली.