X Close
X
9819022904

वाडेकरांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार


wadekar

भारताचे माजी क्रिकेटपटू अजित वाडेकर यांच्या पार्थिवावर शिवाजी पार्क येथील स्मशानभूमीमध्ये शुक्रवारी दुपारी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

मुंबई- भारताचे माजी क्रिकेटपटू अजित वाडेकर यांच्या पार्थिवावर शिवाजी पार्क येथील स्मशानभूमीमध्ये शुक्रवारी दुपारी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

१५ ऑगस्ट रोजी संध्याकाळी वाडेकर यांचे मुंबईच्या जसलोक रुग्णालयात हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले, ते ७७ वर्षांचे होते. शिवाजी पार्क स्मशानभूमीत विद्युतदाहिनीत वाडेकरांच्या पार्थिवाचे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मुंबई पोलिसांकडून वाडेकरांच्या पार्थिवाला मानवंदना देण्यात आली.

आपल्या कर्णधारपदाच्या काळात भारताला वेस्ट इंडिज आणि इंग्लंडमध्ये पहिला कसोटी मालिका विजय मिळवून देणारे कर्णधार म्हणून वाडेकर यांची ओळख होती. भारतीय क्रिकेटच्या प्रतिभावान कर्णधाराला अखेरचा निरोप देण्यासाठी शिवाजी पार्कमध्ये क्रिडाप्रेमी, माजी खेळाडू आणि राजकारणातल्या अनेक दिग्गजांनी उपस्थिती लावली होती. सचिन तेंडुलकर, विनोद कांबळी, निलेश कुलकर्णी, पॅडी शिवलकर यांनी यावेळी वाडेकरांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले.

वाडेकर यांचे पार्थिव शुक्रवारी सकाळी १० वाजता त्यांच्या स्पोर्ट्सफिल्ड अपार्टमेंट, वरळी सी फेस येथील निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. त्यानंतर दुपारी दादर येथील विद्युतदाहिनीमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

बुधवारी रात्री ८:४५ च्या सुमारास त्रास जाणवू लागल्याने वाडेकर यांना वरळी येथील त्यांच्या निवासस्थानाहून जसलोक रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचार सुरु असतानाच रात्री ११ वाजताच्या सुमारास त्यांचे निधन झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. वाडेकर यांच्या पश्चात पत्नी रेखा वाडेकर तसेच तीन मुले आहेत.

यशस्वी क्रिकेटपटू, कर्णधार, संघप्रशिक्षक, संघटक अशा विविध भूमिका वाडेकर समरसून जगले. १९७१मधील इंग्लंड आणि वेस्ट इंडिज दौ-यातील दैदिप्यमान यशाचे श्रेय वाडेकर यांच्या कुशल नेतृत्वाला दिले जाते.

(PRAHAAR)