X Close
X
9819022904

मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी; चाकरमान्यांचे हाल


VAHATUK-KONDI-GOA-ROAD-1
प्रहार वेब टीम माणगाव : गणेशोत्सवासाठी रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुंबईकर चाकरमानी दरवर्षी आपल्या गावाला जात असतात. त्यामुळे मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे प्रवाशांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. चाकरमान्यांना गणेशोत्सवाचे वेध लागले असून गणेशोत्सवासाठी चाकरमानी कोकणात दाखल होऊ लागला आहे. कोकण रेल्वे, एसटी आणि खासगी बसेस केव्हाच हाऊसफुल्ल झाल्याने मुंबईकर चाकरमानी मिळेल त्या वाहनाने कोकणच्या दिशेने निघाला आहे. मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम सुरु आहे. त्यामुळे अनेकांनी मुंबई पुणे एक्स्प्रेसवरुन खोपोली- पुणे- कोल्हापूर मार्गे कोकण गाठण्यासाठी तुडूंब गर्दी केल्याने वाहतूक मंदावली आहे. त्यातच मुंबई-गोवा महामार्गावरही उसरगाव हद्दीत लोणेरेजवळ अपघात झाल्याने या महामार्गावरही मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली होती. एसटीने दोन वाहनांना ठोकर दिल्याने हा अपघात झाला. यात जखमी झालेल्या ७ प्रवाशांना माणगाव उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. मुंबईहून पुण्याकडे व कोकणात गणपतीसाठी जाणा-या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यामुळे मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर मंगळवारी रात्रीपासुन पुण्याकडे जाणा-या मार्गावर वाहतुक मंदगतीने सुरु आहे. त्यामुळे अनेकांनी जुन्या मुंबई-गोवा महामार्गावरुन जाण्याचे ठरवले. महामार्गावर महत्वाच्या समजल्या जाणा-या पेण ते वडखळ या सात किमीच्या मार्गावर हा एकेरी मार्ग असल्याने येथे मोठी वाहतूक कोंडी निर्माण होत असते. पनवेल व खोपोली बाजूकडून येणारी वाहने तसेच वडखळ येथे अलिबाग व नागोठणेवरुन येणारी वाहने याच रस्त्याला मिळत असल्याने वाहतुकीची मोठी समस्या निर्माण होत आहे. त्यातच बेशिस्त वाहनचालक आपली रांग सोडून आपल्या गाड्या पुढे दामटवण्यासाठी मोकळ्या जागेत घुसवत असतात. कासवगतीने चालणा-या वाहनांमध्ये बेशिस्त वाहनचालक वाहतूक कोंडीसाठी कारण ठरत आहेत. त्यामध्ये मिनिडोअर व एसटी चालकही आघाडीवर असल्याचे दिसून येते. बेशिस्त वाहनचालकांमुळे होणारी वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी रायगड जिल्हा वाहतूक शाखेच्या अपु-या पोलीस बंदोबस्तामुळे महामार्गावरील पोलिसांची दमछाक होत आहे. अशा वाहनचालकांवर कोणतीही कारवाई होत नसल्याने वाहनचालक निर्ढावले आहेत. मुंबई-गोवा महामार्गावर खारपाडा, वडखळ, कोलाड, माणगाव येथे वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळतात. कोलाड ते पुई गावादरम्यान कुंडलिका नदीवरील अरुंद पुलामुळे वाहतूक कोंडी झाली होती. महामार्गावर इतर ठिकाणी मात्र कुठेही वाहतूक कोंडी नव्हती. तसेच वाहतूक पोलिस तुरळक ठिकाणीच उभे असल्याने काही प्रवासी व नागरिकांनी वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पुढाकार घेतल्याचे पाहायला मिळाले. (PRAHAAR)