X Close
X
9819022904

मुंबईतील ९३४ शौचालये धोकादायक


toilets

महापालिकेच्या स्ट्रक्चरल ऑडिटमधून उघड

मुंबई – मुंबईतील अनेक शौचालये ही जुनी झालेली असून, या शौचालयांच्या टाक्यांची सफाई न झाल्यामुळे टाक्या फुटून  दुर्घटना घडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबईतील सर्वच शौचालयांचे स्ट्रक्चरल ऑडिट केले. या स्ट्रक्चरल ऑडिटचा अहवाल विभाग कार्यालयांना सादर करण्यात आला आहे. यामध्ये आतापर्यंत २४ पैकी २० विभाग कार्यालयांच्या हद्दीत ऑडिट केलेल्या शौचालयांमध्ये तब्बल ९३४ शौचालये धोकादायक असल्याचे आढळून आले आहे.

महापालिकेच्या सार्वजनिक शौचालयांचे स्ट्रक्चरल ऑडिट तातडीने करण्याचे आदेश महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी जानेवारी महिन्यात सर्व संबंधित सहाय्यक आयुक्तांना दिले होते. त्यानुसार मुंबईतील सर्व सार्वजनिक शौचालयांचे ऑडिट करण्यात येत असून, आतापर्यंत बी, सी, ई आणि जी-दक्षिण वगळता सर्व विभाग कार्यालयांच्या हद्दीतील सावजनिक शौचालयांचे ऑडिट करण्यात आले आहे.

संपूर्ण मुंबईत १४१५ सार्वजनिक शौचालये असून त्यातील आतापर्यंत ९३४ शौचालयांचे ऑडिट करण्यात आले आहे. तर, त्यातील ३५५ शौचालयांचे ऑडिट होणे बाकी आहे; परंतु ऑडिट करण्यात आलेल्या ९३४ शौचालयांपैकी ३८३ शौचालयेही धोकादायक स्थितीत असल्याची आढळून आली आहेत. ही सर्व ३८३ शौचालये सी वन प्रवर्गात मोडत असल्यामुळे ती तोडून पुन्हा त्यांचे बांधकाम करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. तर, १८ सार्वजनिक शौचालयांची मोठय़ा स्वरूपात दुरुस्ती केली जाणार आहे आणि १०२ शौचालयांची किरकोळ स्वरूपात दुरुस्ती हाती घेतली जाणार आहे. या सर्व कामांना ऑक्टोबर २०१८ मध्ये सुरुवात केली जाणार असल्याची माहिती मिळत आहे.

महापालिकेच्या बी आणि सी विभागांमध्ये एकही सार्वजनिक शौचालयांची बांधणी करण्यात आलेली नाही. तर, जी-दक्षिण विभागात ६० सार्वजनिक शौचालये असली तरी ती म्हाडाच्या माध्यमातून बांधली गेलेली आहेत. ती महापालिकेच्या वतीने बांधली नसल्याने त्यांचे ऑडिट करण्यात आलेले नाही. यासंदर्भात उपायुक्त (घनकचरा) विश्वास शंकरवार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, महापालिका आयुक्तांच्या आदेशानुसार सर्व सार्वजनिक शौचालयांचे ऑडिट करण्यात येत आहे. हे ऑडिट सध्या सुरू असून सर्व विभागांमधून ऑडिट येणे बाकी आहे; परंतु यामध्ये काही शौचालये धोकादायक असल्याची आढळून आलेली आहे. सर्व अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्यातील धोकादायक सार्वजनिक शौचालयांच्या पुनर्बाधणीच्या कामाला सुरुवात केली जाईल.

शौचालयांच्या दुघर्टना
५ मार्च २०१५         – मानखुर्द महाराष्ट्रनगर साईबाबा चाळ,१ बळी
४ फेब्रुवारी २०१७    – मानखुर्द मंडालातील इंदिरानगर लोहारचाळ, ३ बळी
२८ एप्रिल २०१८      – भांडुप टँक रोड, २ बळी

विभाग      धोकादायक शौचालये
एम पश्चिम             १५८
एन विभाग              ७०
एस विभाग              ४९
डी विभाग                २६

(PRAHAAR)