X Close
X
9819022904

महिलांकडे वाकड्या नजरेने बघण्याची कोणाची हिंमत होऊ नये म्हणून ‘त्या’ शूर मावळ्यांचे सर्व जिल्ह्यात सत्कार करणार- निलेश राणे


Mumbai:

परभणी जिल्ह्यात दणदणीत सत्कार सोहळा उत्साहात

प्रहार वेब टीम
    
चिपळूण : विश्ववंद्य छत्रपती शिवरायांनी जो आदर्श घालून दिला त्याच मार्गाने आम्ही काम करीत आहोत. राज्यातील महिला भगिनींकडे वाकड्या नजरेने बघण्याची कोणाची हिंमत होऊ नये म्हणून ज्या चार शूर मावळ्यांनी भर कोर्टात कोणाचीही भीडमुर्वत न बाळगता आरोपींवर हल्ला केला त्या मावळ्यांचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे. समाजासाठी लढणा-या या मावळ्यांचे संपूर्ण महाराष्ट्रात कौतुक व्हावे, यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात त्यांचा सत्कार सोहळा घडवून आणला जाईल व उभ्या महाराष्ट्राला त्यांची ओळख करून दिली जाईल, अशी घोषणा महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे सरचिटणीस माजी खा. निलेश राणे यांनी परभणी जिल्ह्यात सोनपेठ तालुक्यातील मौजे नरवाडी येथे सत्कार सोहळ्यात बोलताना केली. तेव्हा श्री नगरेश्वर देवस्थानाच्या प्रांगणात जमलेल्या हजारो ग्रामस्थांनी टाळ्यांचा जोरदार कडकडाट अन् जयजयकाराच्या घोषणांनी आसमंत दुमदुमून टाकला. राणे साहेबांच्या जयजयकारांच्या घोषणांनी दीर्घकाळ आसमंत दणाणून गेला.

कोपर्डी अत्याचार प्रकरणातील नराधमांवर भर कोर्टात हल्ला करणा-या बाबूराव वाळेकर, राजेंद्र जऱ्हाड, गणेश खुणे, अमोल खुणे या चार शिवबा संघटनेच्या मावळ्यांचा भव्य कौतुक सोहळा परभणी जिल्ह्यात उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान माजी खा. निलेश राणे यांनी भूषविले. यावेळी मॉँसाहेब जिजाऊंचे वंशज शिवाजीराजे जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. शिवबा संघटनेच्या या चार शूर मावळ्यांचा यापूर्वी जालना जिल्ह्यात माजी खा. निलेश राणे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला होता. त्या पाठोपाठ आता परभणी जिल्ह्यात त्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी श्री. राणे म्हणाले की, मी ७०० कि.मी. चे अंतर पार करून परभणीला आलो आहे, कशासाठी? तर या शूर मावळ्यांचे कौतुक करण्यासाठी. यांनी कोर्टात नराधमांवर हल्ला केला तेव्हा मी कोकणात होतो. तेव्हा मनात भावनांचा कल्लोळ उठला. वेगवेगळे विचार येऊ लागले. अखेर या शूर मावळ्यांची आपण भेट घेतलीच पाहिजे आणि त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे, असा निर्धार करून सर्वप्रथम त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत जीवन जगणारे हे मावळे आहेत. त्यांच्या कुटुंबीयांनी ना पैसे मागितले ना अन्य वस्तू मागितली, केवळ आमच्या मुलांना सोडवा अशी साद त्यांनी घातली. त्याच क्षणी तुम्ही कोणतीही काळजी करू नका, निलेश राणे जिवंत असेपर्यंत या मावळ्यांना काही कमी पडू देणार नाही, असा शब्द दिला. आणि दिलेले वचन पूर्ण केले. मात्र, या मावळ्यांच्या पाठीशी उभे राहण्यासाठी लोकांची रांग लागली पाहिजे इतके त्यांनी केलेले काम महत्त्वपूर्ण आहे, असे परखड मत त्यांनी मांडले. यापुढे कोणत्याही आईबहिणीकडे वाकड्या नजरेने बघण्याची कोणाची हिंमत होऊ नये, या विचारानेच शूर मावळ्यांनी नराधमांवर कोर्टात हल्ला केला. त्यांच्या बेडरपणाला माझा सलाम आहे, अशा शब्दात श्री. राणे यांनी शिवबा संघटनेच्या मावळ्यांचे कोडकौतुक केले. आपल्या आवेशपूर्ण भाषणात त्यांनी मराठा समाज, कोपर्डी घटना, मराठा आरक्षण व शेतकरी आत्महत्या या विविध विषयांवर भाष्य केले. त्यांच्या प्रत्येक विधानाला उपस्थितांकडून जोरदार प्रतिसाद मिळत होता. हंशा, टाळ्यांचा कडकडाट आणि जयघोष यामुळे देवस्थानच्या प्रांगणात एक वेगळेच चैतन्य निर्माण झाले होते. कधी विनोद तर कधी आवेशपूर्ण भाषण करून श्री. राणे यांनी उपस्थितांची मने जिंकली. आपल्या भाषणात त्यांनी मराठा आरक्षणावर बोलताना सांगितले की, राणे कुटुंबीयांना परमेश्वरी कृपेने काही कमी नाही. पण म्हणून आम्ही काही गप्प बसलेलो नाही. ज्या समाजाने आपल्याला भरभरून दिले त्या समाजासाठी आपणही काम करायला हवे, ही कृतज्ञतेची भावना मनात नेहमी जपली पाहिजे. त्यामुळे समाजाने हाक मारली की, आपण धावून आलो पाहिजे. हीच वेळ आहे एकसंघ होण्याची. आरक्षण मिळाले की, आपलाच माणूस मोठा होणार आहे. राणे साहेबांना मुख्यमंत्र्यांनी नोव्हेंबरपर्यंत वेळ दिली आहे. नोव्हेंबरला जर मराठा आरक्षण मिळाले नाही तर मी स्वत: रस्त्यावर उतरेन, अशी घोषणा त्यांनी केली तेव्हा ‘जय भवानी, जय शिवाजी’. ‘निलेश साहेब आगे बढो हम तुम्हारे साथ है’ अशा गगनभेदी घोषणांनी परिसर दणाणून गेला. आरक्षणासाठी राणे साहेब मुख्यमंत्र्यांना भेटले. आमच्या तरुणांवर दाखल केलेले गुन्हे मागे घ्या ही आमची तिसरी मागणी आहे. आता गप्प बसून चालणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. या शूर मावळ्यांच्या मदतीसाठी मी पुढे आलो तेव्हा ‘साहेब पुढे निवडणूक आहे, यांना मदत करू नका’, असा सल्ला मला देण्यात आला. मात्र, निवडणुकीपेक्षा मला माझा समाज प्रिय आहे. समाजाचे ऋण कधीही विसरता कामा नये. म्हणून समाजासाठी लढणा-या आणि समाजासाठी जगणा-या या चार मावळ्यांना सोबत घेऊन मी महाराष्ट्रात फिरणार आहे, असे त्यांनी घोषित केले. राणे कुटुंबीयांना काही कमी नाही पण आपला उपयोग समाजासाठी झाला नाही तर या जीवनाचा काही उपयोग आहे का? एकट्यासाठी जगू नका. समाज म्हणून आपण एकत्र आलो. त्यातूनच यश साध्य होईल, असे ते म्हणाले. ‘शेतकरी आत्महत्या’ या विषयावर बोलताना ते म्हणाले की, आपण दुस-याना संरक्षण देणारी माणसे आहोत, आत्महत्या करणारी नव्हे. हातात तलवारी घेऊन लढणारी माणसे भ्याडपणे आत्महत्या करीत नाहीत, असे नमूद करून त्यांनी आपल्या भाषणाला पूर्णविराम दिला.

यावेळी जि.प. अध्यक्ष राजेश विटेकर, मराठा समन्वयक अ‍ॅड. सुवर्णा मोहिते, मराठा आंदोलन याचिताकर्ते विनोद पाटील, मनोज जरांगे-पाटील, उमेश शिंदे, जि.प. सभापती विठ्ठल सूर्यवंशी, दत्ताराव गव्हाणे, रुपाली पाटील, भगवान जोगदंड, भागवत गांगर्डे, माधव जाधव, गणेश सकपाळ, बालाजी जाधव, गोपाळ कदम, मनोज तोंडगे, गोविंद पिसाळ, कृष्णा फुकाणे, बाळा जोगदंड, मुन्ना पारवे आदी सकल मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.