X Close
X
9819022904

मंत्र्यांच्या दालनात अधिका-याला कानफडले


Mumbai:

प्रहार वेब टीम :

मुंबई : पैसे घेवूनही काम करत नसल्याचा राग अनावर झाल्याने एकाने मंत्र्यांच्या दालनातच अधिका-याला कानफडल्याची घटना घडली.

सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांचे मंत्रालयाच्या तिसर्या मजल्यावर कार्यालय आहे. त्यांच्या दालनाशेजारील कक्षात पी.ए., पी.एस., अधिकारी, कर्मचारी बसतात. उस्मानाबाद येथील अरुण निटोरे यांची एका आश्रमशाळेची मान्यता आणि एक आश्रमशाळा अनुदानावर आणण्यासाठीची फाईल या कार्यालयात होती. यासाठी मागील तीन वर्षांपासून ते मंत्रालयात हेलपाटे मारत आहेत.

या कामासाठी त्यांनी या कार्यालयातील एका अधिका-याला पैसे दिले आहेत. शुक्रवारी दुपारी त्यांनी त्या अधिका-याला कार्यालयातच गाठून त्याला चांगलेच फैलावर घेतले. काम करण्यासाठी पैसे दिले, इतके दिवस वाट पाहिली पण काम होत नाही, असे सांगत त्यांनी कार्यालयातच गोंधळ घातला.

हा गोंधळ सुरु असतानाच संबंधित अधिका-याने, मी तुझा एक पैशाचा मिंधा नाही, असे म्हणताच निटुरे यांचा राग अनावर झाला आणि त्यांनी त्या अधिका-याला कानफडले. पैसे घेतले अन् वरुन मुजोरी करतो का, असा जाब त्यांनी विचारला. या प्रकाराने कार्यालयात एकच धावपळ उडाली. मंत्री श्री बडोले यांचे पी.ए. काळे, पी.ए. फडणीस यांनी हे प्रकरण मिटविण्याचा प्रयत्न केला.