X Close
X
9819022904

भारतीय राजकारणातील एक उत्तुंग व्यक्तिमत्त्व हरपले


Vajpayee-24344

जात-धर्माच्या चौकटीत न अडकता, सर्वाना सोबत घेऊन राजकारण करणारे एक प्रभावी व तेजस्वी व्यक्तिमत्त्व म्हणजेच माजी पंतप्रधान व भाजपचे ज्येष्ठ नेते अटलबिहारी वाजपेयी.

अटलबिहारी वाजपेयी यांचा जन्म २५ डिसेंबर १९२४ रोजी ग्वालियरच्या एका सुसंस्कृत कुटुंबात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव कृष्णाबिहारी वाजपेयी. आईचे नाव कृष्णा वाजपेयी. अटलजींचे वडील कृष्णाबिहारी वाजपेयी हे शाळेत शिक्षक होते. पण त्याव्यतिरिक्त ते उत्तम कवीसुद्धा होते. वडील स्वत: एक कवी असल्यामुळे अटलजींवर लहानपणीच कवितेचे संस्कार झाले. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी स्वत:ला देशसेवेत झोकून दिले. १९३९ ला अटलजी हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघात सक्रिय झाले.

बाबासाहेब आपटे यांच्या विचारांनी प्रभावित होऊन अटलबिहारी वाजपेयी हे १९४७ ला पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून संघात रुजू झाले. संघात काम करत असताना अटलजींनी राष्ट्रधर्म मासिक, पंचजन्य साप्ताहिक, स्वदेश आणि वीर यांसारख्या दैनिकातही काम केले. तारुण्यावस्थेत असताना अटलजी ब्रिटिश सरकारविरोधातील १९४२च्या भारत छोडो आंदोलनात सहभागी झाले होते व त्यांना तुरुंगवासही झाला. भारतीय जनसंघाची स्थापना करणा-या सदस्यांपैकी अटलजी एक होते. १९६८ ते १९७२ या काळात अटलजी जनसंघाचे अध्यक्ष राहिले. १९५२ मध्ये अटलजींनी पहिली लोकसभा निवडणूक लढवली, पण त्यांच्या पदरी अपयश आले. नंतर १९५७ ला अटलजी बलरामपूरमध्ये खासदारकीची निवडणूक जिंकले. त्यानंतर लोकसभेवर दहा वेळा व राज्यसभेवर दोन वेळा निवडून आले. मोरारजी देसाई यांच्या जनता सरकारमध्ये अटलजी विदेश मंत्री होते. भारतीय जनता पार्टीच्या जडणघडणीत अटलजींचे महत्त्वाचे योगदान आहे. जनता पक्षाचे आघाडी सरकार कोसळल्यानंतर वाजपेयींनी १९८० साली भारतीय जनता पक्षाची स्थापना केली. दमदार व प्रभावी भाषणांमुळे अटलजींना अल्पावधीतच राजकारणात एक आदर व सन्मान प्राप्त झाला. उत्कृष्ट वक्ते म्हणून अटलजींना राजकारणात ओळखले जाते. त्यांच्या वक्तृत्व कौशल्याने प्रभावित होऊन, त्यावेळचे पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी एक भविष्यवाणी केली होती की, ‘एक दिवस अटलजी नक्कीच पंतप्रधान होतील’.

१९९६ साली अटलजी देशाचे पंतप्रधान झाले. पण ते १३ दिवसच पंतप्रधान राहिले. १९९८ च्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर वाजपेयी दुस-यांदा पंतप्रधान झाले. जयललिता यांच्या पक्षाने पाठिंबा काढल्यामुळे १७ एप्रिल १९९९ रोजी अवघ्या एका मताने वाजपेयी सरकार कोसळले. त्यानंतर पुन्हा सार्वत्रिक निवडणुका झाल्या. वाजपेयी पुन्हा पंतप्रधान झाले. १९९९ ते २००४ असा पाच वर्षाचा कार्यकाळ अटलजींनी पूर्ण केला. देशाचे पंतप्रधान असताना अटलजींनी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. अटलजींची संसदेतील भाषणे अविस्मरणीय आहेत. राजकारणातील प्रभावी नेते असलेले अटलजी एक उत्कृष्ट कवी व साहित्यिकही होते.

अटलजींच्या वक्तृत्वात असलेला प्रभावीपणा, त्यांच्या लेखणीतही होता. अटलजींच्या कवितांनी नेहमीच देशवासीयांची मने जिंकली. अटलजींनी नेहमीच आपल्या कवितांमधून देशातील समस्यांना वाचा फोडली आहे. इतकेच नाही तर अटलजींनी लिहिलेल्या ‘एक नहीं, दो नहीं करो बीसों समझोते, पर स्वतंत्रता भारत का मस्तक नहीं झुकेगा’ या कवितेने पाकिस्तानही हादरले होते. ‘हार नही मानूंगा’, ‘दूध मे दरार पड गई’, ‘कदम मिलाकर चलना होगा’, ‘दो अनुभूतिया’, ‘मनाली मत जईयो’, ‘एक बरस बीत गया’ या अटलजींच्या सर्वाधिक लोकप्रिय कविता. भारतीय राजकारणाच्या इतिहासात स्वकर्तृत्वावर एक वेगळी उंची गाठणा-या राजकारण्यांमध्ये अटलजींना गणले जाते. अटलजींच्या बोलण्यात माणुसकी व आपलेपणा होता. म्हणूनच सर्वपक्षीय नेत्यांना त्यांच्याविषयी आदर व प्रेम होते. अटलजींमध्ये एक जबरदस्त नेतृत्वक्षमता होती. सुमारे चोवीस पक्षांना सोबत घेऊन त्यांनी सरकार चालवून दाखवले. काँग्रेसशिवाय सरकार चालवणारे अटलजी पहिलेच पंतप्रधान ठरले. देशासाठी दिलेल्या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल अटलबिहारी वाजपेयी यांना त्यांच्या जन्मदिनी २५ डिसेंबर रोजी २०१४ रोजी देशाच्या राष्ट्रपतींच्या हस्ते, देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान असणा-या ‘भारत रत्न’ या पुरस्काराने गौरवण्यात आले. तसेच १९९२ ला अटलजींचा देशातील सर्वात दुसरा नागरी सन्मान असणा-या ‘पद्मविभूषण’ पुरस्काराने सन्मान करण्यात आला आहे. राजकारणातील प्रदीर्घ कारकिर्दीत अटलजींनी अनेक माणसं जोडली. अटलजींनी अख्खे आयुष्य देशसेवेसाठी खर्ची घातले. तसेच ते आजीवन ब्रह्मचारी राहिले. वाढते वय व प्रकृती अस्वास्थतेमुळे गेल्या अनेक दशकांपासून अटलजी हे राजकारणापासून दूर गेले. पण राजकीय वर्तुळात त्यांच्या नावाची नेहमीच चर्चा असायची. प्रकृती खालावल्यामुळे अटलजींवर दिल्लीच्या एम्स रुग्णालयात गेले नऊ आठवडे उपचार सुरू होते. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. शेवटच्या श्वासापर्यंत अटलजींनी मृत्यूलाही झुंज दिली. पण त्यांचे शरीर डॉक्टरांच्या कोणत्याही उपचाराला प्रतिसाद देत नव्हते. अखेर १६ ऑगस्टला सायंकाळी ५ वाजून ५ मिनिटांनी अटलजींची प्राणज्योत मालवली. त्यांच्या जाण्याने भारताच्या राजकीय इतिहासातील ध्रुवतारा हरपल्याचे दु:ख व्यक्त केले जात आहे. अटलजी जरी या विश्वात नसले, तरी त्यांचे कार्य हे नेहमीच तरुणांसाठी प्रेरणादायी असेल, यात शंका नाही.

()