X Close
X
9819022904

बीस साल बाद!


france-croatia

अखेर फ्रान्सने जग जिंकले. रशियामध्ये झालेल्या विश्वचषक स्पर्धेत सर्वोत्कृष्ट कामगिरी करताना डिडियर डेशचॅम्प यांच्या प्रशिक्षकपदाखालील आणि हय़ुगो लोरिस याच्या कर्णधारपदाखालील संघाने ‘फिफा’चा झळाळता चषक मोठय़ा अभिमानाने उंचावला.

सांघिक कामगिरी हे फ्रान्सच्या दुस-या विश्वचषक जेतेपदाचे प्रमुख वैशिष्टय़ राहिले. मात्र रशियातील ‘फ्रेंचक्रांती’ केवळ खेळ आणि खेळाडूंपुरती मर्यादित नाही. या जेतेपदाने फ्रान्सच्या सर्वधर्मीय आणि सर्व स्तरावरील लोकांना एकत्र आणले. फिफा विश्वचषक स्पर्धा ही ऑलिम्पिकच्याच तोलामोलाची असते. जवळपास शंभर-सव्वाशे संघांमधून अव्वल ३२ संघ मुख्य फेरीसाठी पात्र ठरतात. त्यातून बाद फेरीमध्ये १६ संघांना स्थान मिळते. विश्वचषक स्पर्धा जिंकण्याचे स्वप्न जगातील प्रत्येक संघाचे असते. मात्र एकच संघ जिंकत असल्याने प्रचंड चुरस असते. यंदाही तशीच चुरस पाहायला आणि अनुभवायला मिळाली. १८व्या विश्वचषक स्पर्धेवर नाव कोरण्यात माजी विजेता फ्रान्स यशस्वी ठरला. तब्बल २० वर्षानी त्यांना पुन्हा जेतेपदाला गवसणी घालता आली.

सांघिक कामगिरीसाठी प्रसिद्ध असलेल्या संघांपैकी एक म्हणजे फ्रान्स संघ आहे. एकाहून अनेक सामना जिंकून देणारे (मॅचविनर) खेळाडू असल्यामुळे फ्रान्सला सातत्य राखता आले. फ्रान्सची गटवार साखळीतील कामगिरी लौकिकाला साजेशी नक्कीच नव्हती. बाद फेरीतील ‘राउंड ऑफ सिक्स्टिन’ म्हणजे अंतिम १६ संघांतही त्यांना विजयासाठी घाम गाळावा लागला. त्यानंतर पुढील तीन फे-यांमध्ये फ्रान्सला मागे वळून पाहण्याची गरज भासली नाही. जागतिक आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धामधील बादफेरीमध्ये खेळण्याचा अनुभव त्यांच्या कामी आला. उपांत्यपूर्व फेरीत उरुग्वेविरुद्ध, उपांत्य फेरीत बेल्जियमविरुद्ध आघाडी घेण्यासह ती टिकवण्यासाठी फ्रान्सने घेतलेली मेहनत निश्चितच उल्लेखनीय आहे. अँटोइन ग्रीझमनने कमालीचे सातत्य राखले. त्याला पॉल पॉग्बाची सुरेख साथ मिळाली तरी १९ वर्षीय कीलियन एमबाप्पे याच्या रूपाने फ्रान्सचा नवा ‘मॅचविनर’ गवसला. त्यात उपांत्यपूर्व फेरीत वॅरॅने, उपांत्य फेरीत उमिटिटी आणि अंतिम फेरीत क्रोएशियाविरुद्ध मॅन्ड्झुकिक असे अनेक खेळाडू संघाच्या मदतीला धावले. फ्रान्सच्या यशाने संपूर्ण फ्रान्सवासी आणि त्यांच्या चाहत्यांच्या आनंदाला पारावार उरलेला नाही. त्यामुळे जेतेपदाचा जल्लोष करण्यासाठी फ्रान्समधील सर्वच लोक रस्त्यावर उतरले. सर्वधर्मीय तसेच सर्व स्तरावरील लोकांना एकत्र आणण्याची किमया खेळामध्ये असते. फ्रान्सच्या फिफा विश्वचषक जेतेपदाने त्याचा पुन्हा प्रत्यय आला. फुटबॉल खेळ जगप्रसिद्ध आहे. त्यामुळे जवळपास एक महिना संपूर्ण जग फुटबॉलमय झाले होते. फुटबॉल-इटली वगळता सर्व आजी-माजी विजेते रशियामध्ये आपली दावेदारी दाखवण्यासाठी उतरले होते. त्यामुळे यावेळीही मोठी चुरस होती.

प्रश्न इतकाच होता की, गतविजेता जर्मनीसह फ्रान्स, ब्राझील, स्पेन, अर्जेटिना, पोर्तुगाल हे माजी विजेते संघ कितपत मजल मारतात आणि स्वत:चे अस्तित्व कितपत टिकवून ठेवतात. आजी-माजी विजेते किंवा युरोपियन चषक आणि ऑलिम्पिक विजेत्या संघांचा उल्लेख करण्याचे कारण म्हणजे हे सर्व संघ जेतेपदासाठी प्रबळ दावेदार असतात. हे परिमाण केवळ फुटबॉल नव्हे तर प्रत्येक स्पर्धेदरम्यान वापरले जाते. माजी विजेता इटली संघाने पात्रता फेरीतच दम तोडला होता. त्यांच्यावर पात्रता फेरीतच बाद होण्याची नामुष्की ओढवली. इटलीच्या अनुपस्थितीत जर्मनी, स्पेन, ब्राझील, फ्रान्स, अर्जेंटिना आणि पोर्तुगाल यांच्यावर जेतेपदासाठी सर्वाधिक पैसा लागला. याच संघांकडे विजेता म्हणून पाहिले गेले. सांघिक स्पर्धामध्ये गटवार साखळी आणि बादफेरी हे महत्त्वाचे टप्पे असतात. यंदाची बादफेरी धक्कादायक निकालांनी गाजली. गतविजेता जर्मनी संघाला मेक्सिकोकडून पराभव पाहावा लागला. या धक्क्यातून जर्मन खेळाडू आणि त्यांचे प्रशिक्षक सावरले नाहीत. त्यामुळे जर्मनी संघाला बादफेरीमध्येच गाशा गुंडाळावा लागला. फ्रान्स, पोर्तुगाल, अर्जेटिना आणि पोर्तुगाल संघांनी बाद फेरीचा अडथळा पार केला तरी त्यांच्या खेळामध्ये तितका स्पार्क दिसला नाही. स्पेनचा टाकाटिकी दिसला नाही. फ्रान्सने विजेतेपद मिळवले तरी बाद फेरीत त्यांना डेन्मार्कने बरोबरीमध्ये रोखले होते. अर्जेटिना, पोर्तुगाल आणि ब्राझील संघ यांच्यातील एकटय़ा-दुकटय़ा स्टार खेळाडूंमुळे अधिक चर्चेत राहतात. यंदाचा विश्वचषक याला अपवाद नव्हता.

अर्जेटिना संघाची भिस्त लिओनेल मेसीवर होती. पोर्तुगालकडे जगप्रसिद्ध ख्रिस्तीयानो रोनाल्डो आणि ब्राझीलकडे नेयमार होता. व्यावसायिक (प्रोफेशनल) फुटबॉलमध्ये या त्रिकुटाची कामगिरी सर्वोत्तम आहे. मात्र व्यावसायिक स्तरावर चमकदार कामगिरी करणा-या स्टार खेळाडूंना त्यांच्या देशासाठी अपेक्षित योगदान देता आलेले नाही. ब्राझीलचे जगप्रसिद्ध खेळाडू पेले आणि अर्जेटिनाचा दिएगो मॅराडोना यासारख्या स्टार खेळाडूंनाच आपल्या देशाला वर्ल्डकप जिंकून देता आला आहे. रोनाल्डो आणि मेसी यांनी गेली दोन-तीन दशके फुटबॉल जगतावर राज्य केले आहे. मात्र त्यांच्यासाठी विश्वचषक स्पर्धा दिवास्वप्न बनून राहिले आहे. मेसी याने त्याच्या बार्सिलोना क्लबला युरोपियन, स्पॅनिश तसेच व्यावसायिक स्तरावरील अनेक महत्त्वपूर्ण स्पर्धा जिंकून दिल्यात. विक्रमी वेळा त्याने फिफा म्हणजे आंतरराष्ट्रीय फुटबॉल संघटनेचा सर्वोत्कृष्ट खेळाडूचा मान मिळवला आहे. रोनाल्डोही त्याच्याच तोडीचा आणि जगप्रसिद्ध. त्यानेही रेआल माद्रिद क्लबला मोठय़ा उंचीवर नेऊन ठेवले; परंतु मेसी आणि रोनाल्डो यांचे दुर्दैव म्हणजे दोघांच्याही कारकिर्दीत अनुक्रमे अर्जेटिना आणि ब्राझील संघांना विश्वचषक उंचवता आला नाही. आपल्या देशाला वल्र्डकप किंवा ऑलिम्पिक पदक मिळवल्याचे शल्य त्यांना बोचत आहे. अर्जेटिना आणि ब्राझील संघांनी रशियामध्ये गटवार साखळीचा अडथळा पार केला तरी बाद फेरीच्या पहिल्याच टप्प्यात म्हणजे ‘राउंड ऑफ सिक्स्टिन’ फेरीतच त्यांचे आव्हान संपुष्टात आले. नेयमारच्या ब्राझील संघाचीही तीच गत झाली. त्यामुळे फ्रान्सवर सर्वाच्या नजरा खिळून होत्या. फार चांगली कामगिरी बजावली नसली तरी त्यांनी ब-यापैकी सातत्य राखले.

उपांत्य फेरीत चार संघांमध्ये फ्रान्स आणि इंग्लंड हेच माजी विजेते होते. मात्र त्यांच्यासमोरील आव्हान सोपे नव्हते. बेल्जियम आणि क्रोएशिया हे दोन्ही संघ यंदा चांगलेच फॉर्मात होते. गटवार साखळीत सर्वच्या सर्व तिन्ही सामने जिंकणा-या मोजक्या तीन संघांत त्याचा समावेश होता. बेल्जियमने इंग्लंडला हरवून तिसरा क्रमांक मिळवला. प्रथमच अंतिम फेरी गाठणा-या क्रोएशियाचे फ्रान्सविरुद्ध काहीच चालले नाही. क्रोएशियाला जेतेपदाने हुलकावणी दिली तरी त्यांनी लोकांची मने जिंकली. जागतिक स्पर्धेत अव्वल संघांना मागे टाकून सर्वोत्कृष्ट कामगिरी करू शकतो, हे फार चर्चेत नसलेल्या क्रोएशिया आणि बेल्जियमने दाखवून दिले.

(PRAHAAR)