X Close
X
9819022904

पेट्रोल -डिझेल कडाडले; काँग्रेसची १० सप्टेंबरला ‘भारत बंद’ची हाक


petrol2

मुंबई : पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत सलग १३व्या दिवशी वाढ झाली आहे. पेट्रोल ४८ पैशांनी तर डिझेल ५५ पैशांनी प्रति लिटरने महागले. मुंबईत पेट्रोलचा भाव ८७.३९ रुपये तर डिझेल ७६.५१ रुपयांवर पोहोचले आहे. राज्यातील इतर शहरांच्या तुलनेत अमरावतीत (८८.६४ रुपये प्रति लिटर) सर्वाधिक महाग पेट्रोल मिळत आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ झाली आहे. अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयांचीही दिवसेंदिवस घसरण होत आहे. यामुळे पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ होत असल्याचे तेल कंपन्यांकडून सांगण्यात येत आहे. तसेच हेही यामागचे कारण सांगण्यात येत आहे.

इंधन दरवाढ झाल्याने महागाईचा भडका उडाला आहे. तर दुसरीकडे अनेक बड्या कंपन्यांनी त्यांच्या उत्पादनाच्या किंमतीत वाढ केली आहे. डिझेलचे दर वाढल्याने माल वाहतूकदारांनीही दर वाढवण्याचे संकेत दिले आहेत. यामुळे जीवनावश्यक वस्तूंचे भाव वाढण्याची शक्यता आहे.

माल वाहतुकीचे दर वाढल्यामुळे अनेक कंपन्यांनी आपल्या उत्पादनाचे भाव ५ ते ७ टक्क्यांनी वाढवले आहेत. काही कंपन्यांनी उत्पादनांचे दर तेच ठेवले आङेत. मात्र उत्पादनाच्या वजनात आणि आकारमानात काटछाट केली आहे. यात ब्रिटानिया, पारले, हिंदूस्तान युनिलिव्हर, पॅराशूट, मॅरिको, कोलगेट आदी कंपन्यांचा समावेश आहे.

इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसची १० सप्टेंबरला ‘भारत बंद’ची हाक

इंधनाच्या दरवाढीबद्दल सरकारला जाब विचारत आज काँग्रेसने आक्रमक भूमिका स्विकारली आहे. काँग्रेसने १० सप्टेंबरला सकाळी ९ वाजल्यापासून दुपारी ३ वाजेपर्यंत ‘भारत बंद’ ठेवण्याचे आवाहन केले आहे. ११ लाख कोटी रुपयांच्या ‘फ्यूएल लूट’विरोधात काँग्रेस जन आंदोलन छेडणार आहे. भारत बंद ठेवण्यासाठी आम्ही सर्व विरोधी पक्षांना एकत्र येण्याचे आवाहन केल्याचे काँग्रेस नेते अशोक गेहलोत यांनी सांगितले. तसेच पेट्रोल-डिझेलला जीएसटीच्या कक्षेत आणण्याची मागणी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली आहे.

(PRAHAAR)