X Close
X
9819022904

नागपुरातील पावसाळी अधिवेशनाची हौस भागली


rainfall

विधिमंडळाच्या नागपूर येथील पावसाळी अधिवेशनाचे सूप वाजले. एवढा अट्टहास करून पावसाळी अधिवेशन नागपुरात का घेतले, याचे गुपित काही शेवटपर्यंत उघड होऊ शकले नाही. मात्र, या निमित्ताने एखादा अनाठाई अट्टहास केल्यानंतर कशी फजिती होते, याचा अनुभव सरकारला पहिल्याच आठवडय़ात आला. नागपुरात झालेल्या पावसाने अधिवेशनाचा एक संपूर्ण दिवस कामकाज बंद ठेवावे लागले. विधिमंडळाच्या इतिहासात अशी घटना पहिल्यांदाच घडली. सर्व अडचणींचा सामना करीत अखेर पावसाळी अधिवेशन नागपुरात घेण्याची हौस भागली एवढेच या निमित्ताने म्हणता येऊ शकते.

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी दोन्ही सभागृहाच्या पीठासीन अधिका-यांनी पुढील पावसाळी अधिवेशन ४ जुलैपासून सुरू होईल, असे सांगितले होते. मात्र, ठिकाण निश्चित सांगितलेले नव्हते. जेव्हा एखाद्या अधिवेशनाचे सूप वाजते, तेव्हा पुढील अधिवेशनाची तारीख आणि ठिकाणाची घोषणा पीठासीन अधिकारी करीत असतात. अपवाद मागच्या अधिवेशनाचा ठरला होता. तेव्हापासूनच हे अधिवेशन नागपूरला होणार की, मुंबईत होणार याचा संभ्रम होता. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाली, तेव्हा नागपूर करारान्वये एक अधिवेशन नागपूर येथे घेण्याचे निश्चित झाले होते. नागपूरला उपराजधानीचा दर्जाही देण्याचे त्यावेळी मान्य करण्यात आले होते. झालेल्या कराराप्रमाणे एक अधिवेशन नागपूर येथे होत असे आणि ते हिवाळी अधिवेशन असायचे. अपवाद फक्त चार वेळा झाला होता. १९७१ नंतर पहिल्यांदा पावसाळी अधिवेशन नागपूर येथे झाले. पावसाळी अधिवेशन तिकडे घेण्यासाठी सत्तेतील मित्र पक्ष असणा-या शिवसेनेपासून ते सर्व विरोधीपर्यंत सर्वानीच त्याला विरोध केला होता. मात्र, कुणालाही न जुमानता हे अधिवेशन नागपूरलाच घेण्याचा सरकारचा हट्ट होता. खरे तर सरकारच्या म्हणण्यापेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हट्ट होता, अशी उघड चर्चा सुरू आहे. शेवटपर्यंत हे अधिवेशन नागपूरमध्ये का घेण्यात आले याचे काही कुणी उत्तर देऊ शकले नाही. पण, मुंबई येथील ‘मनोरा’ हे आमदार निवास पुनर्बाधणीसाठी रिकामे करण्यात आल्याने आमदारांच्या राहण्याची सोय नसल्याचे कारण पुढे करण्यात येत होते. मात्र, आता पुढचे हिवाळी अधिवेशन मुंबईत घेण्याची घोषणा करण्यात आली आहे. मग प्रश्न आता असा निर्माण होतो की, आता ‘मनोरा’ आमदार निवास काय आता चार महिन्यांत बांधून होणार आहे का? नागपुरात पावसाळय़ात अधिवेशन घेतल्यामुळे बंदोबस्तावरील पोलिसांपासून ते सर्वसामान्य कर्मचा-यांपर्यंत सर्वाचेच प्रचंड हाल झाले. बहुतेक हिवाळी अधिवेशन नागपुरात होत असल्याने, तेव्हा कोणत्याही वॉटरप्रूफ व्यवस्था उभ्या करण्याची गरज पडत नाही. आता त्या कराव्या लागल्यामुळे सरकारी तिजोरीवरही मोठय़ा प्रमाणात भार पडला असणार यात कोणत्याही प्रकारची शंका नाही.

पहिला आठवडा शोक प्रस्ताव आणि पावसाने वाया घालविला, तर दुस-या आठवडय़ात नाणारच्या प्रश्नांवरून विरोधक आक्रमक झाल्याने फारसे कामकाज होऊ शकले नाही. खरे तर या अधिवेशनात नाणारचा मुद्दा इतर सर्व मुद्दय़ांपेक्षा जास्त चर्चेत राहिला. शिवसेनेचा तोंड देखला, राजकीय दृष्टिकोण डोळय़ासमोर ठेवून सुरू असणारा तकलादू विरोध आणि हा प्रकल्प लादण्याची सरकारची धडपड ही वारंवार दिसून आली; परंतु या काळातच २८८ आमदारांपैकी फक्त नितेश राणे हेच अत्यंत पोटतिडकीने हा प्रश्न मांडताना दिसत होते. नाणारचा विषय विधिमंडळाच्या पटलावर आणण्यासाठी त्यांनी प्रत्येक संसदीय आयुधांचा वापर करण्याचा प्रयत्न केला. इतर आयुधांच्या बरोबरच त्यांनी नाणारच्या प्रश्नावर ‘अर्धा तास’ चर्चेची सूचनाही दिली होती. विधिमंडळामध्ये अर्धा तास चर्चेला विशेष महत्त्व आहे. एखाद्या प्रश्नाची तड लावण्यासाठी या आयुधांचा वापर करण्याचा अधिकार विधानसभेच्या सदस्याला आहे. प्रत्येक आठवडय़ातील मंगळवार आणि गुरुवार हे दोन दिवस या आयुधासाठी राखीव ठेवण्यात आलेला असतो. आमदार नितेश राणे यांनी नाणारच्या प्रकल्पावर अध्र्या तासाच्या चर्चेचा प्रस्ताव दिला होता. तो कामकाज पत्रिकेत दाखविण्यातही आला होता. अधिवेशन संपायला एक दिवस बाकी असताना, गुरुवारी नाणारवरील नितेश राणे यांची अर्धा तास चर्चा कामकाज पत्रिकेत दाखविण्यात आली होती.

पण, इतर प्रस्तावावरील चर्चा वाढत गेली. इतर कामकाज वाढत होते आणि अध्र्या तासाची चर्चा लांबत होती, तेव्हा नितेश राणे कमालीचे अस्वस्थ होत होते. माझ्या भागावर नाणार प्रकल्पाच्या रूपाने येणारे संकट हे माझ्या जनतेसाठी किती घातक आहे, हे सभागृहात मांडण्यासाठी नितेश राणे आतुर झाले होते. त्यासाठी त्यांनी वाचनालयात बसून अनेक संदर्भ काढले होते. त्याचे दाखले देत, हा प्रकल्प इथून हटवावा, अशी मागणी पुन्हा एकदा ते सभागृहात करणार होते; परंतु वेळ वाढत होता. इतर चर्चा सुरू होत्या, तरी नितेश राणे सभागृहात आपल्या चर्चेची वेळ येईल, म्हणून वाट पाहत होते. अखेर रात्री दहा वाजता त्यांनी याबाबत विधान मंडळ कार्यालयात किती वाजता चर्चा येईल, अशी विचारणा केली, तेव्हा या चर्चेला उत्तर देण्यासाठी उद्योगमंत्री किंवा मुख्यमंत्री विधान भवनात हजर नसल्याने ही चर्चा होणार नाही, असे त्यांना सांगण्यात आले. तेव्हा ते कमालीचे नाराज झाले. विधिमंडळ अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी त्यांनी आपल्या मनातला संताप बोलून दाखविला. सदस्यांना आपल्या भागातील प्रश्न मांडण्यासाठी विविध आयुधे आहेत. मात्र, गेल्या काही दिवसांपासून अशा आयुधांचा वापरच होताना दिसत नाही. अध्र्या तासाची चर्चा हे अत्यंत महत्त्वाचे आयुध असून, आठवडय़ातून मंगळवार आणि गुरुवार असे दोन दिवस त्यासाठी निश्चित केलेले आहेत. मात्र तीन आठवडय़ांत एकाही अध्र्या तासाची चर्चा होऊ शकली नाही. आयुधांचा वापरच करायला मिळणार नसेल, तर हे आयुध बाद तरी करून टाका, असा संताप व्यक्त करीत त्यांनी सभात्याग केला होता. इतर सदस्यांनीही आपल्या मनातील भावना, अशाच रीतीने खासगीत व्यक्त केल्या.

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा एक आठवडा पावसात, दुसरा गोंधळात, तर तिसरा कसाबसा कामकाजात गेला. एकंदर पावसाळी अधिवेशन नागपूर येथे घेण्याची हौस भागली, एवढेच या निमित्ताने म्हणता येईल.

(PRAHAAR)