X Close
X
9819022904

थकीत कर्जाचे ३५ हजार भरण्यासाठी केली संघवींची हत्या


hdfc-sidharth-sangavi

मुंबई : एचडीएफसी बँकेचे उपाध्यक्ष सिद्धार्थ संघवी यांच्या मृत्यूचे गूढ उकलण्यात पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी अटकेत असलेल्या सरफराझ शेख (२०) याने केवळ ३५ हजारांसाठी संघवी यांची हत्या केल्याचे पोलिसांच्या चौकशीत निष्पण्ण झाले आहे. बुधवारी ५ सप्टेंबर रोजी कमला मिल येथून गायब झालेल्या संघवी यांचा मृतदेह ९ सप्टेंबर रोजी कल्याण येथील हाजीमलंग येथे सापडला.

पोलिसांचा शोध सुरू असतानाच ७ सप्टेंबर रोजी त्यांची कार नवी मुंबई येथील ऐरोली सेक्टर ११ जवळ सापडली. संघवी यांच्या मोबाइलवरून नवी मुंबई पोलिसांनी आधी कार आणि नंतर सरफराझ शेख याला बेलापूर येथून ताब्यात घेतले. शेख याने चौकशीदरम्यान तीन वेगवेगळ्या कहाण्या सांगितल्या. आधी त्याने ‘हत्या मीच केली’, असे सांगितले. मग, तो संघवींची हत्या आधीपासूनच घडली होती फक्त त्यांचा मृतदेह दडवण्याची जबाबदारी माझ्यावर होती, असे सांगू लागला. त्यानंतर त्याने एचडीएफसी बँकेतील एका अधिकारी महिलेसह संघवी यांच्या दोन सहका-यांची नावे घेतली. पोलिसांनी या दोघांकडे कसून चौकशी केली. मात्र कार्यालयातील अन्य अधिकारी-कर्मचारी, कुटुंबिय, मित्र परिवाराकडील चौकशी आणि तांत्रिक तपासात या दोघांचा संघवी यांच्या हत्येशी संबंध स्पष्ट होत नव्हता. अखेर पोलिसांनी आपल्या स्टाईलने चौकशी करताच शेख याने मीच पैशासाठी सिद्धार्थ याला मारल्याचे सांगितले, असा दावा मुंबई पोलिसांनी पत्रकार परिषदेत केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मूळचा उत्तर प्रदेशचा असलेला शेख कमला मिल पार्किंग लॉटमध्ये तीन वर्षांपूर्वी सरफराज फॅब्रिकेटर म्हणून काम करत होता. त्यामुळे त्याला या परिसराची चांगलीच माहिती होती. चार महिन्यांपूर्वी तो पुन्हा त्याच ठिकाणी कामाला लागला होता. बाईकचे थकीत ३५ हजार रुपयांचे हप्ते भरण्यासाठी बँकेने सरफराजकडे तगादा लावला होता. त्यामुळे ३५ हजार रुपयांची तजवीज कशी करावी या चिंतेत तो होता. त्यामुळे पार्किंग लॉटमध्ये सुरक्षारक्षक आणि सीसीटीव्ही नसल्याचा फायदा घेण्याचे त्याने ठरवले. सरफराज हा पाच दिवस संघवी यांच्या मागावर होता. संघवी एचडीएफसी बँकेत मोठ्या हुद्द्यावर असल्याने संघवींकडे ३५ हजार रुपयांची रोकड किंवा तितक्या किमतीच्या वस्तू असतील असा सरफराजचा कयास होता. सिद्धार्थ संघवी पार्किंग लॉटमध्ये आपल्या गाडीच्या दिशेने जात असताना सरफराजने त्यांना गाठले आणि सुरीच्या धाकाने त्यांना धमकावले. मात्र संघवींनी प्रतिकार केला. त्यामुळे रागाच्या भरात सरफराजने त्यांना ठार मारले. संघवींचा मृतदेह त्याने त्यांच्याच गाडीत मागच्या सीटवर ठेवला. आठ वाजल्यापासून ते रात्री बारा वाजेपर्यंत सरफराझ गाडीतच बसून होता. त्यानंतर कल्याणला जाऊन हाजीमलंग रोडवर काकडवाल गावाजवळ रस्त्याच्या कडेला त्यांचा मृतदेह फेकला. पुढे ती गाडी घेऊन सरफराज नवी मुंबईतील कोपरखैरणे भागात आला. तिथे तो राहत असलेल्या परिसरातच त्याने गाडी सोडून दिली. गाडीत सापडलेल्या सुरीनेच सिद्धार्थ संघवी यांची हत्या केल्याची कबुली सरफराजने दिली असल्याचे पोलीस उपायुक्त अभिनाश कुमार यांनी सांगितले.

संघवी यांची हत्या केल्यानंतर सरफराझने त्यांचा मोबाइल लगेच बंद केला. कल्याण येथे मृतदेह टाकल्यानंतर आणि संघवी यांची कार नवी मुंबईत सोडल्यानंतर तो घरी गेला. संघवी यांचा मोबाइल महागडा असल्याने त्याने दुस-या दिवशी सुरू केला आणि त्यात स्वतःकडचे सीम कार्ड टाकले. गुरुवारी आणि शुक्रवारी काहीवेळा मोबाइल सुरू करण्यात आला होता. यामुळेच तो पोलिसांच्या हाती लागला.

दरम्यान, सिद्धार्थ संघवी यांचा मृतदेह घेऊन कल्याणपर्यंत जाण्याचा धोका सरफराजने कसा काय पत्करला, या गुन्ह्यात त्याचे कोणी साथीदार आहेत का, याचा तपास पोलीस करत आहेत.

(PRAHAAR)