X Close
X
9819022904

तुर्कस्तानात हुकूमशहाचा उदय


turkistan

रेचेप तय्यीप एर्दोगान हे नाव सामान्य जनतेला कदाचित माहीत नसेल, परंतु हे नाव आंतरराष्ट्रीय राजकारणात आज चच्रेत आले आहे. तुर्कस्तान हा जगातील एक छोटासा देश. जगात बहुतेक टर्की या नावाने प्रसिद्ध. जागतिक राजकारणात भाग न घेणारा अलिप्त देश!

आताच तुर्कस्तानात अध्यक्षपदासाठी निवडणूक झाली. या निवडणुकीत विद्यमान अध्यक्ष रेचेप तय्यीप एर्दोगान यांनी ५२% मतांसह पहिल्याच फेरीत विजय मिळवला. या निवडणुकीबरोबर संसदीय निवडणुकीतसुद्धा एर्दोगान यांच्याच पक्षाला बहुमत मिळाले आहे. गेली १५ वष्रे तुर्कस्तानात एर्दोगान यांचाच एकछत्री अंमल असून त्यांची आता हुकूमशाहीकडे वाटचाल सुरू झाली आहे. एर्दोगान हे २००३ ते २०१४ या कालावधीत तुर्कस्तानचे पंतप्रधान होते व नंतर अध्यक्षपद त्यांनी स्वत:कडे घेतले. आता झालेल्या निवडणुकीत झुंजार प्रचाराने एर्दोगान यांच्यापुढे प्रचंड आव्हान उभे करणारे विरोधी पक्षनेते आणि मुख्य प्रतिस्पर्धी मुहर्रम इनसे यांना ३२% मते मिळाली आणि ते पराभूत झाले, परंतु प्रचारादरम्यान विषम संधी न मिळाल्यामुळे आणि मतमोजणीत प्रचंड गोंधळ झाल्याचा आरोप त्यांनी एर्दोगान यांच्यावर केला. इतकेच नाही तर आंतरराष्ट्रीय निरीक्षकांनीसुद्धा मतमोजणीत गोंधळ झाल्याचा ठपका ठेवला आहे.

तुर्कस्तान हा जगातील एक छोटा देश असला तरी भौगोलिकदृष्टय़ा तुर्कस्तानला एक वैशिष्टय़पूर्ण स्थान मिळाले आहे. तुर्कस्तानचा काही भाग आशिया खंडात तर काही भाग युरोप खंडात असल्याने एक वेगळे भौगोलिक महत्त्व या देशाला लाभले आहे. युरोप आणि आशिया या दोन्ही खंडांना जोडणा-या पुलाचे ऐतिहासिक आणि नसíगक कार्य तुर्कस्तानने केले आहे. डोंगरद-यांचा देश असे या देशाचे दुसरे महत्त्व आहे. तुर्कस्तानच्या एका बाजूने इराण, सीरिया आणि अझरबैजान हे देश आहेत, तर पश्चिमेकडे मेडिटेरिअन समुद्र आहे आणि दक्षिण पश्चिमेकडून ग्रीस आणि बल्गेरिया या दोन युरोपियन देशांच्या सीमा जोडल्या आहेत. एकेकाळी ‘ऑटोमन’ साम्राज्याचा भाग असलेल्या या देशाला कमाल पाशा यांच्या नेतृत्वाने अधुनिक राष्ट्र बनवले होते. अनेक सुधारणा त्यांनी केल्या आणि त्यामुळे आशिया आणि युरोप खंडात विभागलेला हा देश आदर्श राष्ट्र मानले जाऊ लागले.

रेचेप तय्यीप एर्दोगान हे २००३ ते २०१४ पर्यंत तुर्कस्तानचे पंतप्रधान होते. त्यापूर्वी १९९४ ते १९९८ पर्यंत ते इस्तंबुलचे मेयर होते. २००१ मध्ये त्यांनी ‘जस्टीस अँड डेव्हलपमेंट’ (एकेपी) या पार्टीची स्थापना केली आणि २००२, २००७ आणि २०११च्या सार्वत्रिक निवडणुकीत घवघवीत यश मिळवले, परंतु कमाल पाशा यांच्या कारकिर्दीत धर्मनिरपेक्ष असलेल्या तुर्कस्तानमध्ये एर्दोगान यांनी धार्मिक विधींवर असलेली बंदी हटवली, त्यामुळे परंपरावादी मुस्लिमांचा मोठा पाठिंबा त्यांना मिळाला. ‘‘धर्माचे अस्तित्व या विचारप्रणालीने मोडीत निघत आहे. आधुनिक पुरोगामी विचारप्रणाली राष्ट्राच्या प्रगतीच्या आड येत आहे, हे विचार आणि या विचारांचे पुरस्कत्रे दूर केल्याखेरीज आपल्या देशाला वैभव प्राप्त होणार नाही,’’ असा धार्मिक प्रचार करत करत एर्दोगान यांचा राजकीय क्षितिजावर उदय झाला आणि बघता बघता त्यांच्या पाठीराख्यांची आणि भक्तांची संख्या एवढी वाढली की एर्दोगान यांच्या रूपाने एक हुकूमशाहा निर्माण झाला हे त्या देशाच्या लोकांना आणि भक्तांना कळलेही नाही आणि मग मात्र कपाळावर हात मारून घेण्याची त्यांच्यावर वेळ आली.

याच हुकूमशाहा तय्यीप एर्दोगान यांना तुर्की नागरिकांनी पुन्हा एकदा पाच वर्षासाठी निवडून दिले आहे. (ही निवडणूक अर्थात एकतर्फीच झाली होती.) त्यापूर्वी म्हणजे एप्रिल २०१७ मध्ये तुर्कस्तानने नवीन राज्यघटना स्वीकारत अध्यक्षीय पद्धती स्वीकारली आहे. राज्यघटनेतील हा मोठा बदल एर्दोगान यांच्या दबावामुळे आणि आग्रहामुळे करण्यात आला होता. एर्दोगान अध्यक्ष झाल्याने त्यांच्या हाती अमर्याद सत्ता आणि अधिकार आले असून लोकशाहीची गळचेपी होणार असल्याची भीती तुर्कस्तानमध्ये व्यक्त केली जात आहे. एप्रिल २०१७ मध्ये स्वीकारलेल्या नव्या घटनेप्रमाणे त्या देशात आता पंतप्रधानपद संपुष्टात आले असून सर्व अधिकार अध्यक्षांकडेच एकवटले आहेत. देशाच्या न्याय यंत्रणेत आणि अर्थखात्यातसुद्धा हस्तक्षेप करण्याचे अधिकार त्यांच्या हातात आता आले आहेत. तुर्कस्तानचे लष्कर एर्दोगान यांच्याच हातात राहणार आहे. लोकशाहीचा गाभा असलेल्या विविध यंत्रणांचे अधिकार या राज्यघटनेमुळे आता संपुष्टात आले आहेत. नव्या राज्यघटनेप्रमाणे तय्यीप एर्दोगान २०२८ पर्यंत सत्ता त्यांच्या हाती ठेवू शकतील. थोडक्यात काय तर तय्यीप एर्दोगान यांनी अमर्याद सत्ता आपल्या हातात ठेवली असून तुर्कस्तानचे सर्वेसर्वा हुकूमशाहा होण्याच्या मार्गावर आहेत. गेल्या वर्षी एर्दोगान यांच्या विरोधात कथित बंड झाले होते; परंतु आंतरराष्ट्रीय निरीक्षकांच्या मताप्रमाणे विरोधकांचे कंबरडे मोडण्यासाठी एर्दोगान यांनीच या बंडाचे नाटक केले होते आणि नंतर याच बंडाचे कारण दाखवत एर्दोगान यांनी विरोधकांचे बेसुमार अटकसत्र सुरू केले. लाखो राजकीय विरोधक आणि पत्रकारांना त्यांनी तुरुंगात डाबवून टाकले. सरकारविरोधात कारस्तान असा दावा करत हे अटकसत्र त्यांनी सुरू केले होते. आज अवघ्या ८ ते ९ कोटींच्या या देशात १ लाख ६० हजार बंदिवान तुरुंगात आहेत. जगाला दाखविण्यासाठी लोकशाही, परंतु पार्लमेंट आणि अध्यक्षपद या एकाच व्यक्तीच्या हातात राहणार आहेत.

आज तुर्कस्तानमध्ये एक देश, एक धर्म, एक नेता आणि राष्ट्रवादाचे वारे वाहू लागले आहेत. कडवा राष्ट्रवाद आज तेथे निर्माण केला गेला आहे. धर्माला विरोध म्हणजे देशाला विरोध, म्हणजे देशद्रोही ही धारणा तेथे निर्माण करण्यास एर्दोगान यांच्या पक्षाला यश मिळाले आहे. त्याचप्रमाणे आपल्या नेत्याला विरोध म्हणजे (एर्दोगान यांना) देशद्रोह, नेत्यावर टीका म्हणजे खोटय़ा बातम्या, अफवा ‘पुरोगामी विचारधारणेकडे लक्ष देऊ नका’ अशा प्रचार आणि युक्तिवादावर टर्कीच्या लोकांनी विश्वास ठेवला आणि एका हुकूमशाहा अध्यक्षाला पुन्हा निवडून दिले. तय्यीप एर्दोगान अध्यक्ष म्हणून निवडून आल्यानंतर प्रथम अभिनंदन रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी केले. एर्दोगान यांच्या काळात अमेरिका आणि तुर्कस्तान यांच्या संबंधात तणाव निर्माण झाला आहे. पूर्वी अमेरिका आणि तुर्कस्तान यांचे संबंध चांगले होते, आज हा देश रशियाच्या गटात गेला आहे.

एकेकाळी आदर्श आणि सुस्थितीत असलेल्या या देशात धर्म आणि राष्ट्रवादाच्या धुंदीत जनतेने कडव्या हुकूमशाहाच्या हातात हा चांगला देश दिला आहे. आज एर्दोगान यांच्या कारकिर्दीत देशाची अर्थव्यवस्था डबघाईला आली आहे. त्यांच्या चलनाचे चांगलेच अवमूल्यन झाले आहे, परंतु सामान्य तुर्की लोकांना दुर्दैवाने आज याचे गांभीर्य कळणार नाही! असो.

(PRAHAAR)