X Close
X
9819022904

डेंग्यू, लेप्टो, चिकनगुनियाचा प्रसार – एक सामाजिक आपत्ती


dengue

पावसाळा आल्यानंतर आणि विशेषत: पाऊस थांबल्यानंतर आपल्याकडे साथीचे रोग येतात. त्यात गेल्या काही वर्षापासून डेग्यू, लेप्टो हे फार मोठे आव्हान आहे. त्याबाबत जनजागृती होणे गरजेचे आहे.

आरोग्य ही प्रत्येकाची सर्वोत्तम संपत्ती आहे. त्यासाठी प्रत्येकाने आपल्या सभोवतालचा परिसर स्वच्छ ठेवणे आवश्यक आहे. एवढेच नव्हे तर प्रत्येकाने अस्वच्छतेबद्दलची मानसिकता बदलली तर स्वत:बरोबर दुस-याचे आरोग्यही चांगले ठेवू शकतो. आज बदलत्या वातावरणामुळे घातक असे साथीचे आजार मोठय़ा प्रमाणावर फैलावत आहेत. अशा घातक साथीच्या आजारामुळे कित्येकांना प्राणास मुकावे लागत आहे. सध्या डेंग्यूबरोबर लेप्टो, चिकनगुनिया, अशा आजाराचे प्रमाण वाढत आहे, ही चिंताजनक बाबा आहे. नुकताच लोकमान्य टिळक रुग्णालयामध्ये १५ वर्षीय मुलाला लेप्टोस्पायरोसिसमुळे जीव गमवावा लागला. गेल्या वर्षी डेंग्युमुळे २४ जणांचा मृत्यू झाला होता. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार डेंग्यू हा आजार स्वच्छतेच्या अभावामुळे होतो. ज्या ठिकाणी डबकीक साचतात तिथे डेंग्यूच्या डासांचा प्रादुर्भाव निर्माण होऊन तिथे अशा रुग्णाचं आणि त्यांच्या मृत्यूचे प्रमाण अधिक आढळते. विशेषत: बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी साचलेल्या पाण्यातून या आजाराचा फैलाव होतो.

सर्वसामान्य नागरिक महापालिकेला कर देते, असे असताना महापालिकेच्या सर्व उपाययोजना या फक्त कागदावरच राहात असल्यामुळे त्या नैतिक कर्तव्याला धरून राबवल्या जात नाहीत. परिणामी डेंग्यू, लेप्टो, चिकनगुनियासारखे घातक रोगांचा थैमान वाढत आहे. डेंग्यू, लेप्टो, चिकनगुनिया अशा रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस होत असलेली वाढ पाहता हा मानवी जीवनाची सामाजिक आपत्तीच म्हणावी लागत आहे. एवढेच नव्हे तर मानवी जीवनात निर्माण झालेला अंतर्गत धोकाच आहे. आज हा आजार जगभर पसरला आहे. देशातील वाढती लोकसंख्या आणि त्या तुलनेत अपुरी पडणारी सार्वजनिक स्वच्छता यामुळे अशा आजाराचे प्रमाण वाढत आहे. १९५० पासून जगभर पसरत असलेल्या डेंग्यूला प्रतिबंध घालण्यास अपयश येत आहे. या तापाला कारणीभूत ठरणारा विषाणूही आता अधिक प्रगत बनत चालला असल्यामुळे प्रगत लस तयार करणे हे संशोधकांसमोर एक आव्हान उभे राहत आहे. अशातच डेंग्यूचे प्रमाण अधिक असले तरी पालिका प्रशासन मात्र त्याबाबत उदासीनताच दाखविते.

वाढते नागरीकरण, बदलते हवामान तसेच बांधकामासाठी व पिण्यासाठी साठवून ठेवलेल्या स्वच्छ पाण्यात डेंग्यूच्या डासांचे प्रमाण वाढत असल्याचे पालिका आरोग्य विभागाचे मत आहे. म्हणूनच साठविलेले पाणी, तुंबलेली गटारे, साचलेले पाणी यावर फवारणी याकडे सर्वसामान्य जनतेने लक्ष ठेवणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे त्यांना गरज असणारी आरोग्यविषयक यंत्रणा जागी करून त्यावर उपाय शोधणे गरजेचे आहे. सध्या ज्येष्ठ नागरिकांना धोकादायक ठरत आहे. अशातच रोगप्रतिकारशक्ती कमी होत असल्यामुळे दैनंदिन जीवनात आवश्यक ते बदल करणे फारच गरजेचे आहे.

आज डेंग्यू, लेप्टो, चिकनगुनिया या आजारांच्या विषाणू यांची कल्पनाच येत नसल्यामुळे नेमके कोणते उपचार करावेत याविषयी डॉक्टरच अनभिज्ञ असतात. कारण या आजारात ताप, सांधेदुखी, सर्दी, खोकला, घसादुखी यासारखी लक्षणे या विषाणूजन्य आजारात आढळतात. डेंग्यू, लेप्टो, चिकनगुनियाची चाचणी करून घेण्याचा सल्ला डॉक्टर रुग्णांना देतात, परंतु त्यांची लक्षणे दिसत असूनही चाचणी निगेटिव्ह येण्याचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळेच असे डॉक्टरही निर्बुद्ध होत आहेत. या सर्व गोष्टींचा विचार करता देशभरात या आजारांबाबत उदासीनता दिसून येते. त्यामुळे पालिका प्रशासनाची आरोग्य यंत्रणा कोणती उपाययोजना करतात, हे एक न सुटणारं कोडं आहे.

वास्तविक साचलेली पाण्याची डबकी नव्हे तर कच-यांचे ढीग येथेही डासांची उत्पत्ती होत असते. आजची परिस्थिती पाहता शहरात स्वच्छतेबद्दल उदासीनताच पाहावयास मिळते. त्यासाठी प्रथम प्रत्येकाने मानसिकता बदलण्याची गरज आहे. कारण डेंग्यू, चिकनगुनियाबद्दल प्रभावी उपचार निर्माण झालेले नाहीत. त्यामुळे स्वच्छता व डासांच्या उत्पत्तीला आळा घालणे हे त्यांना प्रतिबंध घालण्याचे प्रमुख उपाय आहेत. कारण डेंग्यूचे काही प्रकार प्राणघातक ठरतात. झोपडपटय़ातील लोकांसाठी हा आजार जीवघेणा ठरत आहे. डासांचे निर्मूलन हा यावरचा प्रभावशाली उपाय असला तरी पालिका प्रशासन नियमितपणे कीटकनाशक फवारणी करण्यास हतबल ठरत आहे.

अशातच जागोजागी टाकण्यात येणारा कचरा, तसेच नागरिकांची स्वच्छतेविषयी असलेली उदासीनता, नित्कृष्ट कामामुळे रस्त्यावर पडणारे खड्डे आणि त्यामध्ये साचणारे पाणी, गाडीचे टायर, शहाळी खाऊन फेकून दिल्यामुळे त्यामध्ये साचणारे पाणी यासारख्या कारणांमध्ये प्रामुख्याने जनतेमध्ये असलेली उदासीनता तसेच राजकीय इच्छाशक्तीचा अभाव आणि पालिका अधिका-यांची अक्षम्य दिरंगाई या घटना या आजाराच्या प्रसाराला कारणीभूत ठरत आहेत. एकूण समाज जीवनावर परिणाम करणारा आजार समूळ नष्ट करण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. अन्यथा अशा प्रकारच्या विषाणूजन्य अजाराचं थैमान एक सामाजिक आपत्ती ठरून ती नागरिकांसाठी हानी ठरणार आहे.

(PRAHAAR)