X Close
X
9819022904

जपान, अबुधाबीतून मुंबईच्या इकोफ्रेंडली मखरांना मागणी


typhoon
प्रहार वेब टीम मुंबई : सर्वांच्या लाडक्या बाप्पाचे आगमन होण्यासाठी काही दिवस शिल्लक आहेत. पर्यावरणाबाबत जनजागृती होत असल्याने बाप्पाच्या शाडूच्या मूर्तीला शोभेल असे इकोफ्रेंडली मखर घेण्याकडे सर्वांचा कल आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ‘उत्सवी’ ही संस्था नाविन्यपूर्ण पर्यावरणपूरक मखर बनवण्यावर भर देत आहे. घरगुती तसेच मोठ्या मंडळांसाठीही मखर बनवले जाते. यंदाही या संस्थेतर्फे आकर्षक इकोफ्रेंडली मखर बनवण्यात आले आहेत. केवळ देशात नाही तर परदेशातूनही या मखरांना वाढती मागणी असल्याचे ‘उत्सवी’चे संस्थापक नानासाहेब शेंडकर यांनी दै.‘प्रहार’च्या वेब टीमशी बोलताना सांगितले. मुंबई, ठाणे, पनवले, कोकण या भागातून मखरांना मोठ्या प्रमाणात मागणी येत आहेच. विशेष म्हणजे अमेरिका, जपान, अबुधाबीतून या मखरांना मागणी असल्याचे शेंडकर यांनी आवर्जून सांगितले. बाप्पाची भव्यदिव्य मूर्ती, त्याच्याभोवती केलेली सजावट, ढोलताशांच्या गजरात बाप्पांचे होणारे स्वागत असा आनंददायी सोहळा अनुभवण्यासाठी प्रत्येकजण आतुरतेने वाट बघत आहे. थर्माकोलचे मखर, चायनीज सजावटींच्या वस्तू घेण्याकडे नागरिकांचा कल होता. पण राज्य सरकारने घातलेल्या प्लास्टीक बंदीमुळे पर्यावरणपूरक मखरांची मागणी वाढली आहे. या निर्णयाचे नागरिकांनी स्वागत केले असल्याने बाजारपेठेतील चित्र बदलले असल्याचे शेंडकर यांनी सांगितले. शेंडकर यांनी जे.जे.स्कूल आॅफ आर्टसमधून शिक्षण घेतले आहे. गेली अनेक वर्षे ते जाहिरात, चित्रपट, नाट्यक्षेत्रांमध्ये कार्यरत आहेत. शेंडकर यांचा स्वत:चा थर्माकोल मोल्डींगचा कारखाना होता. थर्माकोलमुळे होणारे प्रदूषण लक्षात घेता २००१साली त्यांनी थर्माकोल मखरांची निर्मिती करणे बंद केले. तेव्हापासून ते कागदी लगदा, पुठ्ठा अशा पर्यावरणपुरक वस्तूंपासून मखर बनवण्यावर भर देत आहेत. दिड फुटांच्या बाप्पाच्या मूर्तीपासून ते २० फुटांपर्यंतच्या मूर्तीसाठी इकोफ्रेंडली मखर बनवण्यात येतात. पिवळा, केशरी, गुलाबी, हिरवा असे रंगीबेरंगी मखर बनवण्यामागे २०० कामगार मेहनत घेत असल्याचे शेंडकर यांनी आवर्जून सांगितलेल. २५०-३०० रूपयांपासून ते लाखांपर्यंत या मखरांची किंमत आहे. कागद, पुठ्यापासून बनवलेली सुंदर, टिकाऊ, फोल्डींगची मखरे शेंडकर यांची खासियत आहे. परदेशात ज्या ठिकाणी मंडळे गणेशोत्सव साजरे करतात त्यांची या इकोफ्रेंडली मखरांसाठी मागणी असते. प्लास्टीक, थर्माकोलच्या सजावटींच्या वस्तूंमुळे पर्यावरणाची मोठी हानी होते. याबाबत नागरिकांमध्येही जनजागृती होत आहे. यामुळे नागरिक स्वत:हूनच पर्यावरणपूरक मखरांसाठी मागणी करत असल्याचे शेंडकर यांनी सांगितले. हे पाहता ३०-४० वर्षांपूर्वीचे चित्र आठवते. त्यावेळी मखर बनवण्यासाठी पर्यावरणपूरक वस्तूंचा वापर केला जायचा. कालांतराने त्याची जागा थर्माकोलने घेतली. पण त्यामुळे होणारी हानी लक्षात घेता नागरिक स्वत:हूनच पर्यावरणपूरक मखरांची मागणी करत असल्याचे शेंडकर म्हणाले. (PRAHAAR)